शिवसेनेने खासगीकरणाच्या मुद्द्यावरुन मोदी सरकारला लगावला जोरदार टोला

मुंबई | देशातील खासगीकरणामुळे भविष्यात नोकऱ्यांचा प्रश्न निर्माण होईल, सर्व कंपन्या खासगी झाल्या तर सर्वसामान्यांना मुलांना नोकऱ्या कोण देणार असे काही प्रश्न भाजपा खासदार वरुण गांधी यांनी नुकतेच एका कार्यक्रमामध्ये उपस्थित करत थेट मोदी सरकारला घरचा आहेर दिला होता. त्यातच वरुण गांधींनी केलेल्या या टीकेवरुन शिवसेनेने भाजपाच्या नेतृत्वाखाली केंद्रात सत्तेत असणाऱ्या सरकारवर सडकून टीका केली आहे.
‘केंद्र सरकारने विविध सरकारी उपक्रम आणि बँकांच्या खासगीकरणाला सुरवात केली आहे. त्यावरून विरोधकांसह सर्वच पातळ्यांवर टीका होत असली तरी केंद्रातील सत्ताधारी त्यावर सोयिस्कर मौन बाळगून आहेत. बोलायचेही नाही आणि जे करायचे आहे ते सोडायचेदेखील नाही, असेच एकंदरीत केंद्र सरकारचे खासगीकरणाबाबतचे धोरण आहे. आता भाजपचेच एक खासदार वरुण गांधी यांनीही त्यावरूनच स्वपक्षाला घरचा आहेर दिला आहे.
‘उत्तर प्रदेशमध्ये एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी केंद्राच्या धोरणावर सडकून टीका केली. ‘केंद्र सरकार खासगीकरणाच्या नावावर सगळेच विकून टाकत आहे. त्यामुळे कोटय़वधींच्या रोजगारावर तर गदा आलीच आहे, परंतु अर्थव्यवस्थादेखील धोक्यात आली आहे,’ असे वरुण गांधी म्हणाले. सरकारी नोकऱ्या देण्याऐवजी आहेत त्या काढून घेण्याचे उफराटे धोरण सध्या राबविले जात आहे, असेही ते म्हणाले,’ असे शिवसेनेने ‘सामना’च्या अग्रलेखात म्हटले आहे.
‘वरुण गांधी हे नेहरू-गांधी परिवारातील असले तरी ते भाजपाचे खासदार आहेत. त्यांच्या आई मनेका गांधी या देखील बरीच वर्षे भाजपाच्याच खासदार राहिल्या आहेत. मोदी सरकारमध्ये त्यांनी मंत्रिपदही भूषविले आहे. त्यामुळे वरुण गांधी यांची टीका त्यांच्या पक्षधुरिणांना झोंबणारी नक्कीच आहे. राहुल गांधी यांची टीका ‘राजकीय’ वगैरे असल्याची बतावणी भाजपावाले नेहमीच करीत असतात. मग आता त्यांच्याच पक्षाचे खासदार वरुण गांधी यांनी केलेल्या टीकेबद्दल त्यांचे काय म्हणणे आहे?,’ असा प्रश्न शिवसेनेने उपस्थित केला आहे.






