मुंबईकरांना मोठा दिलासा! वीस वर्षांहून जुन्या इमारतींच्या गच्चीत शेड उभारण्यास पालिकेने दिली परवानगी

मुंबई- मुंबई शहर व उपनगरातील वीस वर्षांहून जुन्या इमारतींचे आता उन्हा-पावसापासून संरक्षण होणार आहे. या इमारतींच्या गच्चीवर पत्राशेड बांधण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी शिवसेना आमदार अजय चौधरी यांनी केली होती आणि गेली तीन वर्षे ते याचा पाठपुरावा करत होते.अखेर या मागणीला यश आले असून महापालिकेने पत्राशेड बांधण्याची परवानगी दिली आहे.
दरम्यान, हा धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी महापौर किशोरी पेडणेकर, तत्कालीन म्हाडा अध्यक्ष उदय सामंत, म्हाडा सभापती विनोद घोसाळकर, शिवसेना प्रतोद सुनील प्रभू आणि महापालिका व म्हाडा अधिकाऱ्यांचे मोलाचे सहकार्य मिळाल्याचे आमदार चौधरी यांनी सांगितले आहे. ही शेड तात्पुरती असेल आणि दर तीन वर्षांनी परवानगीचे नूतनीकरण करावे लागेल. पहिल्या तीन वर्षांसाठी दोन रुपये प्रति चौरस फूट अधिक जीएसटी किंवा पाच हजार रुपये अधिक जीएसटी यापैकी जे अधिक असेल ते आकारून परवानगी काढावी लागणार आहे.
शेडची उंची ५ फुटांपेक्षा अधिक असता कामा नये आणि ती गच्चीच्या स्लॅबपासून मोजवी लागणार आहे. मोडकळीस आलेल्या तसेच रूफ टॉप रेस्टॉरंटवाल्या इमारतींना हे धोरण लागू होणार नसल्याचे महापालिकेने नमूद केले आहे.