राज्यात पुन्हा कोरोना फोफावतोय,कालच्या तुलनेत आजची रुग्ण संख्या दुप्पट

मुंबई : राज्यात सध्या कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटने सर्वांची डोकेदुःखी वाढवली आहे. ओमायक्रोनने राज्यात मोठ्या प्रमाणात शिरकाव केल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे कोरोना बाधितांची संख्या दोन हजारांच्या पुढे गेल्याचं दिसून आलं आहे. अशातच राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जानेवारी-फेब्रुवारीमध्ये कोरोना रुग्ण संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तवली आहे.
मुंबईत काल १,३७७ रुग्ण आढळले होते, तर आज जवळपास त्याच्या दुप्पट म्हणजे २,५१० रुग्ण आढळले. वाढती रुग्णसंख्या आणि नागरिकांचा निष्काळजीपणा लक्षात घेत जयविजय न्यूजने यापूर्वीच धोक्याचा इशारा दिला होता. आज आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनीही धोक्याचा इशारा दिला आहे.
कोरोना रुग्णवाढ ही तिसऱ्या लाटेची सुरुवात असू शकते, असे आदित्य ठाकरे म्हणाले आहेत, तर राज्यात अधिक कडक निर्बंध लागू शकतात, असे राजेश टोपे म्हणाले आहेत.
डिसेंबरमध्ये सुरुवातीला १०८ पर्यंत आलेली कोरोना रुग्णसंख्या कालपर्यंत १३ पटीने वाढली होती. आज तर कालच्या पेक्षाही जवळपास दुपटीने रुग्णसंख्या आढळली आहे. जानेवारीच्या मध्यास ती फोफावणार असल्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे आता सावध राहा एवढेच आपण म्हणू शकतो.
मुंबईत रविवारी ९२२ रुग्ण आढळले होते, तर सोमवारी त्यात घट होत ८०९ रुग्ण आढळले होते. पण मंगळवारी १,३७७ रुग्ण सापडले आज २,५१० रुग्ण आढळले. तेव्हा पहिल्या, दुसऱ्या लाटेप्रमाणे आता तिसरी लाट येणार हे जवळ जवळ निश्चित आहे.
मुंबईची आज २,५१० रुग्ण आढळल्याने एकूण रुग्णसंख्या ७,७५,८०८ झाली. आज २५१ रुग्ण बरे झाले. त्यामुळे बरे झालेल्यांची एकूण संख्या ७,४८,७८८ झाली. आज एका रुग्णाचा मृत्यू झाला. मृतांची एकूण संख्या १६,३७५ झाली.मुंबईत सध्या ८,०६० सक्रिय रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत.