मुघलांनीच आपल्या देशासाठी मोठं योगदान दिलं -नसीरुद्दीन शाह

मुंबई:- अभिनेते नसीरुद्दीन शाह आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे कायम चर्चेत असतात.दोनच दिवसांपूर्वी त्यांनी मुघलांबाबत केलेल्या एका वक्तव्यामुळे ते पुन्हा एकदा चर्चेमध्ये आले आहेत. सोशल मीडियावर त्यांच्या वक्तव्याचे पडसाद दिसून येत आहेत. एका टीव्ही शोला दिलेल्या मुलाखतीदरम्यान नसीरुद्दीन शाह यांनी मुघलांना ‘राष्ट्र निर्माते’ म्हटलं आहे.
मुलाखतीची ही क्लिप सध्या सोशल मीडियावर बरीच व्हायरल होत आहे.याचा आधार घेत सोशल मीडिया यूझर्स नसीरुद्दीन शाह यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल करत आहेत. ‘द वायर’ या न्यूज पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत नसीरुद्दीन म्हणतात,’मुस्लिमांमध्ये भीती निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. मात्र, मुस्लिम याचा सामना करतील.
कारण आम्हाला आमचं घर वाचवायचं आहे, आम्हाला आमची मातृभूमी वाचवायची आहे, आपलं कुटुंब वाचवायचं आहे आणि आपल्या मुलांना वाचवायचं आहे.मात्र, आपण हे का विसरतो, की या मुघलांनीच देशासाठी मोठ्या प्रमाणात योगदान दिलं आहे. याच लोकांनी देशामध्ये कित्येक स्मारकं उभारली आहेत. यांच्या संस्कृतीमध्ये नाच, गाणी, चित्रकारी, साहित्य अशा गोष्टींचा समावेश आहे. मुघल इथे या देशाला आपला देश बनवण्यासाठी आले होते. त्यांना खरं तर आपण शरणार्थी म्हणू शकतो’. मात्र दुसरीकडे या वक्तव्याचा नेटकऱ्यांकडून निषेध व्यक्त केला आहे. सोशल मीडियावर नेटकऱ्यांकडून प्रतिक्रियांचा पाऊस पडत असून त्यांना नेटकऱ्यांनी धारेवर धरले आहे.