राज्यात दिवसभरात १२ हजारांहून जास्त नवीन कोरोनाबाधितांची नोंद

मुंबई- राज्यातील कोरोना संसर्ग पुन्हा एकदा झपाट्याने वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. कारण, दैनंदिन रूग्ण संख्या ही मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहे. शिवाय, ओमायक्रॉनबाधितांच्या संख्येतही दररोज भर पडतच आहे. आज दिवसभरात राज्यात १२ हजार १६० नवीन कोरोनाबाधित आढळले आहेत. तर ओमायक्रॉनचे ६८ रूग्ण आढळून आले. याचबरोबर ११ करोनाबाधित रूग्णांच्या मृत्यूची देखील नोंद झाली आहे.
तसेच, राज्यात आज १ हजार ७४८ रुग्ण करोनामुक्तही झाले असून, आजपर्यंत एकूण ६५,१४,३५८ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०५ टक्के एवढे झाले आहे.
राज्यात आज एकूण ५२,४२२ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आता राज्यातील करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ६७,१२,०२८ झाली आहे. राज्यात आजपर्यंत १४१५५३ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. तर, सध्या राज्यातील मृत्यूदर २.१ टक्के एवढा आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६,९३,७०,०९५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६७,१२,०२८ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३,३२,६१० व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत. तर १०९६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.




