मोदींच्या सुरक्षेतील त्रुटीमागे अमित शाह यांचा हात तर नाही ना; नाना पटोलेंचा गंभीर आरोप

मुंबई:- पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी पंजाबमधील लखीमपूरच्या दौऱ्यावर होते.या दौऱ्यादरम्यान स्थानिक मोर्चेकऱ्यांनी पंतप्रधानांचा रस्ता अडवल्याने त्यांच्या ताफ्याला १५ ते २० मिनिटे एका जागेवरच थांबावे लागेल.यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव पंतप्रधानांना हा दौरा रद्द करून दिल्लीला परतावं लागलं.
पंतप्रधानांच्या सुरक्षेत पंजाब पोलिसांकडून हलगर्जीपणा झाल्याचे सांगत करत केंद्रीय गृहमंत्रालयाने यासंदर्भातील अहवाल मागवला आहे. दरम्यान ही घटना घडल्यानंतर देशभर विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात टिका-टिपण्या सुरू झाल्या आहेत.पंजाबमध्ये काँग्रेसचं सरकार असल्यामुळे भाजपकडून काँग्रेसवर टिकास्त्र डागलं जात आहे.
अश्यातच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. नाना पटोले यांनी सुरक्षेच्या त्रुटीमागे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा हात तर नाही ना? अशी शंका व्यक्त केली आहे. मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही शंका उपस्थित केली आहे.
माध्यमांशी बोलत असताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी,’एक सोडून तीन-तीन केंद्रीय गुप्तचर यंत्रणा आहेत. या यंत्रणांकडून सगळ्या गोष्टींची माहिती घेतली जाते. या गुप्तचर यंत्रणा केंद्रीय गृहखात्याच्या नियंत्रणात असतात. जी घटना घडली त्यामध्ये पंजाब सरकार जबाबदार आहे, अशा पद्धतीचं भासवून पुन्हा एक नौटंकीचा आधार घेऊन पाच राज्यांमध्ये निवडणुका जिंकता येतील का, हा प्रयत्न भाजपच्यावतीने सुरु आहे. खरंतर या घटनेच्यामागे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचादेखील हात तर नाही ना? हाही प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला आहे’, असं मत व्यक्त केलं आहे.
दरम्यान काँग्रेसचा मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेनं या घटनेची चौकशी व्हावी अशी मागणी केंद्रीय गृहमंत्रालयाला केली आहे.येत्या काळात हा मुद्दा अधिकच चिघळण्याची शक्यता आहे.