महाराष्ट्र

माणसाची संस्कृती घडविणारी वृत्तपत्रे आणि पुस्तके हजारो वर्ष टिकतील;ज्येष्ठ सनदी अधिकारी दिलीप पांढरपट्टे यांचा ठाम विश्वास

मुंबई :- सोशल मिडीया आणि इलेक्ट्रॉनिक मिडीयाचा वाचन संस्कृतीवर परिणाम झाल्यामुळे वृत्तपत्रे आणि पुस्तके यांच्या भवितव्याविषयी चर्चा केली जात आहे. मात्र वृत्तपत्रे आणि पुस्तके यावरच माणसाची संस्कृती अवलंबून आहे, असे ठाम मत व्यक्त करून वाचणारी माणसे असेपर्यंत पुढील हजारो वर्ष वृत्तपत्रे आणि पुस्तके टिकून राहतील, असा ठाम विश्वास महनीय प्रवक्ते, राज्य शासनाच्या जलसंधारण आणि रोजगार हमी योजनेचे सचिव आणि ज्येष्ठ गझलकार दिलीप पांढरपट्टे यांनी व्यक्त केला. मुंबई मराठी पत्रकार संघाच्या पत्रकार दिनानिमित्त ते बोलत होते.

मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे काल गुरुवारी ६ जानेवारी रोजी पत्रकार भवनात पत्रकार दिनानिमित्त पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पत्रकारांना ज्येष्ठ सनदी अधिकारी पांढरपट्टे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. समारंभाच्या अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष नरेंद्र वि. वाबळे होते.या समारंभास संघाचे विश्वस्त अजय वैद्य, वैजयंती कुलकर्णी-आपटे, संघाचे उपाध्यक्ष सुधाकर काश्यप आदी उपस्थित होते.

‘कालच्या कत्तलीचा हा खरा अहवाल नाही,कोणत्याही अक्षराचा रंग लालेलाल नाही’,असा गझलेचा मार्मिक शेर पेश करून पांढरपट्टे म्हणाले की, ‘सांडलेलं रक्त काळ्या-पांढऱ्या अक्षरात मांडणे सोपे नसते. मात्र, पत्रकार अशा घटनेचेही अचूक वृत्तांकन करतात’, ही मोठी गोष्ट असल्याचे ते म्हणाले.

प्रिंट मिडीयाचे काय होणार? पुस्तके वाचणे बंद होईल का? अशा चर्चा ऐकायला मिळतात. मात्र वृत्तपत्रे आणि पुस्तके ही संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. न्यूज चॅनेलवर दृश्य स्वरुपात बातमी दिसते. मात्र प्रिंट मिडीयात बातमीचे आणि बातमीच्या मागचे विश्लेषण करण्याला मोठी संधी असते.

त्यामुळेच वृत्तपत्रे वाचली जातात. चित्रपटात नजरेसमोर चित्र असते. मात्र पुस्तक वाचताना आपली कल्पनाशक्ती चित्र उभे करीत असते. त्यामुळेच वृत्तपत्रे आणि पुस्तके वाचली जातात, संस्कृती घडवितात. पुस्तक हे संस्कृतीचे मस्तक आहे. त्यामुळे हजारो वर्षे टिकतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

श्रीलंकेतील जाफना शहर लष्कराने बेेचिराख केल्यानंतर शहरातील जनतेने तिथल्या गं्रथालयाचे रक्षण आणि संवर्धन केले याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला. पत्रकार हे साहित्यिकच आहेत. त्यांचे प्रासंगिक लिखाण हे दर्जेदार साहित्यच असते, असेही ते म्हणाले.

मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वि. वाबळे यांनी कोरोनामुळे वृत्तपत्रांमधील नोकरकपात, पत्रकारांची वेतन कपात परिणामी पत्रकार आणि पत्रकारितेतर कर्मचाऱ्यांवर ओढवलेले संकट याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली.

महनीय प्रवक्ते पांढरपट्टे यांच्या हस्ते खालील पुरस्कार विजेत्यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह आणि भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.

1) आप्पा पेंडसे पत्रकारिता पुरस्कार : बृहन्मुंबईतील नागरी समस्यांवरील लिखाणासाठी श्री. देवेंद्र कोल्हटकर (झी 24 तास)
2) जयहिंद प्रकाशन पुरस्कार : उत्कृष्ट पुस्तकासाठी `भेदाभेद भ्रम अमंगळ’ – संत विचार आणि संविधानिक मूल्य श्री. शामसुंदर सोन्नर (ज्येष्ठ पत्रकार)
3) कॉ. तु. कृ. सरमळकर पुरस्कार : कामगार, झोपडपट्टी, भाडेकरू, घर दुरुस्ती व दलितोद्धार यासाठी श्री. नितीन बिनेकर (ईटीव्ही भारत)
4) विद्याधर गोखले ललित लेखन पुरस्कार : उत्कृष्ट ललित लिखाणासाठी श्री. मुकेश माचकर (कार्यकारी संपादक, मार्मिक)
5) रमेश भोगटे पुरस्कार : उत्कृष्ट राजकीय बातम्या व राजकीय वृत्तांतासाठी श्री. समीर मणियार (दै. महाराष्ट्र टाईम्स)
6) `शिवनेर’कार विश्वनाथराव वाबळे स्मृती पुरस्कार : शिक्षण क्षेत्रातील उत्कृष्ट बातम्यांसाठी सीमा महांगडे (दै. लोकमत)
प्रास्ताविक पत्रकार संघाचे कार्यवाह विष्णू सोनवणे, आभार संयुक्त कार्यवाह खलिल गिरकर यांनी मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. लतिका भानुशाली यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!