मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांनी केली पाच राज्यातील निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा

नवी मुंबई- कोरोना महामारीचा संसर्ग वाढत असताना दुसरीकडे पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा आज केंद्रीय निवडणूक आयोगानं केली आहे. पाच राज्यांपैकी उत्तर प्रदेश निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांनी पाच राज्यातील निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा केली आहे.
उत्तर प्रदेशसह ऊर्वरित चारही राज्यांमध्ये आजपासून निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. सर्व पाच राज्यात एकूण सात टप्प्यात मतदान होणार आहे. एकूण ४०३ आमदार असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये सर्व सात टप्प्यांत मतदान होणार आहे. त्यातील पहिल्या टप्प्याचे मतदान १० फेब्रुवारी रोजी होणार आहे. तर शेवटच्या टप्प्यातील मतदान हे ७ मार्च रोजी होणार आहे. तर मतमोजणी ही १० मार्च रोजी होईल.
पंजाब, उत्तराखंड आणि गोव्यामध्ये एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. या तिन्ही राज्यांमध्ये १४ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. तर मणिपूरमध्ये दोन टप्प्यात मतदान होणार आहे. मणिपूरमध्ये २७ फेब्रुवारी आणि ३ मार्च अशा दोन टप्प्यात मतदान होणार आहे. तर उत्तर प्रदेशमध्ये १०, १४, २०, २३, २७ फेब्रुवारी आणि ३ व ७ मार्च अशा एकूण सात टप्प्यात मतदान होईल.



