अमेरिकेत यशस्वी प्रयोग, डुकराचे हृदय बसवले माणसाला

अमेरिका :- आजवर मानवाचे हृदय मानवाला बसवण्याचा प्रयोग अनेक डॉक्टरांनी यशस्वी करून दाखवला आहे. अशातच आता एका व्यक्तीला डुकराचे हृदय बसवण्याचा प्रयोग अमेरिकेत यशस्वी रित्या पार पडला आहे. जगातील हा पहिलाच प्रयोग अमेरिकेत झाला असून अमेरिकेतील औषध नियामक संस्थेने नव्या वर्षाच्या सुरूवातीला या सर्जरीला परवानगी दिली होती.
या परवानगीनंतर त्यानुसार मागच्या शुक्रवारी डॉक्टरांनी डुकराचे हृदय या व्यक्तीच्या शरीरात यशस्वी प्रत्यारोपण करून त्याचे प्राण वाचवले. डेव्हिड बेनेट असे हृदय प्रत्यारोपण झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. युनिव्हर्सिटी ऑफ मेरीलँड मेडिकल स्कूलने सोमवारी एक निवेदन जारी करून या शस्त्रक्रियेबाबत माहिती दिली. हृदय प्रत्यारोपणाची सर्जरी झाल्यानंतर तीन दिवसांनी संबंधित रूग्ण व्यवस्थित बरा झाला.
तसेच या यशस्वी सर्जरीनंतर आता अवयव दानातील कमतरता भरून निघेल अशी शास्त्रज्ञांना आशा आहे. हृदय प्रत्यारोपण केलेले डॉ. बार्टले ग्रिफिथ सांगतात, हृदय दान करणाऱ्या लोकांची संख्या खूप कमी आहे. या प्रयोगाने अवयव दानाची कमतरता भरून निघणार आहे. हा प्रयोग भविष्यात रूग्णांसाठी महत्वाचा आहे. डेव्हिड बेनेट याच्यावर शस्त्रक्रिया करण्याच्या त्याच दिवशी सकाळी प्रत्यारोपण पथकाने डुकराचे हृदय काढले होते. शस्त्रक्रिया होईपर्यंत त्याचे कार्य टिकवून राहावे यासाठी ते एका विशेष उपकरणात ठेवले होते, अशी माहिती प्रत्यारोपण पथकाने दिली.





