लोकांच्या पोटावर पाय आणू नका; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना आवाहन

नवी दिल्ली – देशात सध्या कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. केंद्र आपल्या परिने हा संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न करत आहे. अश्यातच कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी काल चर्चा केली होती. यावेळी कोरोनाला रोखण्यासाठी उपाययोजना करताना लोकांच्या पोटावर पाय येणार नाही, याची दक्षता घ्या, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना सांगितले आहे.
याचसोबत ओमायक्रॉन विषाणूमुळे रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. जिथे मोठ्या प्रमाणावर संसर्ग झाला असेल, तिथे स्थानिक स्तरावर कन्टेन्मेंट झोन तयार करण्यात यावा, अशीही सूचना देखील त्यांनी यावेळी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांतील मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून गुरुवारी चर्चा केली. या बैठकीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याऐवजी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे हजर होते.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर झालेल्या मणक्याच्या शस्त्रक्रियेमुळे त्यांच्या हालचालींवर सध्या मर्यादा आल्या आहेत,त्यामुळे काल ते या बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत.
मुख्यमंत्र्यांनी सलग दोन- अडीच तास बसणे टाळावे, असा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. त्यामुळे राज्याचे मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती यांनी पंतप्रधान कार्यालयाला पत्र लिहून राज्याच्या वतीने आरोग्यमंत्री राजेश टोपे बैठकीला उपस्थित राहतील, असे कळविले होते. पंतप्रधान कार्यालयाने त्याला मान्यता दिल्यानंतर टोपे यांच्यासह गृहमंत्री दिलीप वळसे पाटील या बैठकीत सहभागी झाले होते. या बैठकीत राज्यातील कोरोना स्थिती, लसीकरण, उपाययोजना व निर्बंधांबाबत माहिती दिल्याचे टोपे म्हणाले.






