डोंबिवलीत अवतरला थरारक झोंबी; मराठी फिल्म झोंबिवलीच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद..

मुंबई- गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेत असलेला ‘झोंबिवली’ या सिनेमाचा ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरमध्ये सस्पेन्स आणि थ्रिलर पाहायला मिळतोय. या सिनेमात अभिनेता अमेय वाघ,ललित प्रभाकर, अभिनेत्री वैदेही परशुरामी मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. हॉलीवूड सिनेमात पाहिलेले झोंबी खरंच डोंबिवलीत आले तर काय होईल याचं विनोदी आणि थरारक चित्रण या सिनेमात केलं गेलंय.
या अनुभवी कलाकारांसोबत काही नवखे कलाकार देखील आपल्याला या सिनेमात पाहायला मिळणार आहेत. आदित्य सरपोतदार यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं असून त्यांनी रोमँटिक आणि हॉरर या दोन्ही जॉनरचा वापर या सिनेमात केला आहे.
हा सिनेमा ४ फेब्रुवारीला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार असून सोशल मीडियावर या सिनेमाची जोरदार चर्चा होताना पाहायला मिळतेय. दरम्यान या सिनेमातल्या कलाकारांचे ‘अंगात आलया’ या गाण्यावरचे रिल्स सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.