राज्यात आज कोरोना बधितांपैकी कोरोनामुक्त रुग्णांची संख्या जास्त,वाचा सविस्तर वृत्त

मुंबई : राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्येत चढ-उतार दिसून येत आहे. गेल्या २४ तासात राज्यात कोरोनाच्या ४३ हजार ६९७ नव्या रुग्णांची नोंद झाली असून ४९ जणांचा मृत्यू झाला आहे.दिलासादायक बाब म्हणजे राज्यात गेल्या २४ तासात ४६,५९१ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. काल राज्यात कोरोनाच्या ३९ हजार २०७ रुग्णांची नोंद झाली होती. म्हणजे आज चार हजार रुग्णांची वाढ झाली आहे.
तर राज्यात आज २१४ ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. आतापर्यंत २०७४ ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात झाली आहे. त्यापैकी १०९१ रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहेत.
मुंबईतील कोरोना परिस्थिती
मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने आता मुंबईतील रुग्णसंख्या काहीशी स्थिरावल्याचं दिसून येत आहे. आज यात किंचीतशी घट झाली आहे.मुंबईत आज ६ हजार ३२ नवे रुग्ण आढळले असून १२ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.तर नव्या बाधितांच्या तुलनेत जवळपास तिप्पट रुग्ण म्हणजेच १८ हजार २४१ जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे सध्या मुंबईचा रिकव्हरी रेट वाढून ९५ टक्के इतका आहे.