ज्येष्ठ पत्रकार दिनकर रायकर यांचे निधन, मराठी पत्रकारितेत दिलं ५० वर्षांहून अधिक काळ योगदान

मुंबई:- पत्रकारिता क्षेत्रातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. तब्बल ५० हून अधिक वर्ष पत्रकारितेत सक्रिय असलेले ज्येष्ठ पत्रकार आणि लोकमतचे माजी समूह संपादक दिनकर रायकर यांचे आज पहाटे वयाच्या ७९ व्या वर्षी निधन झालं आहे.गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांना डेंग्यू आणि कोरोनाची लागण झाली होती असे डॉक्टरांनी सांगितले.
काही दिवसांपूर्वी डेंग्यू झाला म्हणून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, यानंतर डेंगू बरा झाला पण या उपचारादरम्यान त्यांना लंग इन्फेक्शन ८० टक्के झाले होते. मुंबईतील नानावटी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार करण्यात येत होते. मात्र,उपचारांना त्यांचे शरीर साथ देत नव्हते.
गुरुवारी डॉक्टरांमार्फत करण्यात आलेली त्यांची RT-PCR टेस्ट निगेटिव्ह आली होती. मात्र आज पहाटे त्यांना श्वसनाचा त्रास जाणवू लागला आणि यातच त्यांचं निधन झालं. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी, मुलगा,मुलगी असा परिवार आहे.
पत्रकारिता क्षेत्रात स्वतः ला वाहून घेणारे, पत्रकारितेची जाण असणारे, समाज भान राखून पत्रकारिता करणारे ज्येष्ठ पत्रकार आज पत्रकार क्षेत्राने गमावले आहेत.गेली काही वर्षं त्यांनी लोकमत समूहाच्या संपादक पदाची जबाबदारी सांभाळली आहे.
त्यांनी केलेल्या पत्रकारी क्षेत्रातल्या कामगिरीबाबत त्यांना आजपर्यंत विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या कृ. पां. सामक जीवनगौरव पुरस्काराने रायकर यांना सन्मानित करण्यात आले होते. महाराष्ट्र शासनाचा जीवनगौरव पत्रकारिता पुरस्कारही त्यांना मिळाला होता. रायकर यांना पुढारीकार ग.गो.जाधव पुरस्कार, सुशीलादेवी देशमुख पत्रकारिता पुरस्कार, रोटर इंटरनॅशनल पत्रकारिता पुरस्कार, कृषीवलकार प्रभाकर पाटील पत्रकारिता पुरस्कार अशा विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. ते मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे, तसेच मुंबई प्रेस क्लबचे माजी अध्यक्ष होते.
उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही वाहिली रायकरांना श्रद्धांजली-
‘ज्येष्ठ पत्रकार दिनकर रायकर यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक चळवळींचा अभ्यासक, राज्याच्या वाटचालीतील अर्धशतकाचा महत्वाचा साक्षीदार हरपला आहे. दिनकर रायकर यांची पत्रकारिता राज्यकर्त्यांसाठी मार्गदर्शक, जनसामान्यांना न्याय मिळवून देणारी होती. पत्रकारितेतील अर्धशतकाच्या वाटचालीत त्यांनी राज्यातील अनेक सामाजिक प्रश्नांना वाचा फोडली. राज्याच्या विकासप्रक्रियेत महत्वाचं योगदान दिलं. युवा पत्रकारांना मार्गदर्शन केलं. प्रोत्साहन दिलं. पत्रकारितेत तरुणांच्या पिढ्या घडवल्या. त्यांचं निधन ही राज्याच्या पत्रकारिता, साहित्य क्षेत्राची मोठी हानी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो,’ अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्येष्ठ पत्रकार दिनकर रायकर यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करून त्यांना श्रद्धांजली वाहिली.