वाईन विक्री विरोधात कोर्टात जाऊ;चंद्रकांत पाटलांचा राज्य सरकारला इशारा

मुंबई:- सुपर मार्केटमध्ये वाईन विक्री करण्याची मान्यता देणारा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयाविरोधात सध्या विरोधी पक्ष आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. अशात अनेक संघटनांनी देखील या निर्णयाला विरोध केला आहे. यातच आता भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ‘वाईनविक्री विरोधात कोर्टात जाऊ’, असा इशारा राज्य सरकारला दिला आहे.
गेल्या दोन दिवसांपासून वाईन विक्री विरोधात विरोधी पक्षनेते राज्य सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न करत आहेत. अशात कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी,’शेतकऱ्यांच्या धान्याची दारू बनवायची आणि तीच दारू शेतकऱ्यांच्या मुलांना विकायची,हे राज्य सरकारचं धोरण अतिशय लाजिरवाणे आहे. राज्य सरकारने जर हा निर्णय मागे घेतला नाही,तर आम्ही या विरोधात कोर्टात जाऊ आणि राज्य सरकार विरोधात याचिका दाखल करू’, असे आव्हान दिले आहे.
हे सर्व पाहता सध्या राज्यातील वाईन विक्री विरोधात चांगलेच राजकारण तापले असून सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा वाद येत्या काळात रंगण्याची चिन्ह आहेत.