ऑनलाईन परिक्षेसाठी दहावी व बारावी चे विद्यार्थी रस्त्यावर उतरले ; शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या घरासमोर आंदोलन

मुंबई- दहावी आणि बारावीची वार्षिक परीक्षा ऑनलाईन घ्यावी या मागणीसाठी आज राज्यातील ४ प्रमुख शहरात विद्यार्थी आक्रमक झाले व त्यांनी थेट रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यास सुरूवात केली. विद्यार्थी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरल्याने पोलीस आक्रमक झाले व त्यांनी विद्यार्थ्यांना पांगवण्यासाठी लाठीमार केल्याचे पाहायला मिळाले.
मुंबई, नागपूर, औरंगाबाद व उस्मानाबाद येथे विद्यार्थी परीक्षा ऑनलाईन घ्यावी या मागणीसाठी रस्त्यावर उतरले होते. तर, धारावीमध्ये शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या घरासमोर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज देखील केल्याचं समोर आलं आहे.
यावर आता राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रतिक्रिया देत,’शालेय विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून केलेले आंदोलन हे योग्य नाही. महाराष्ट्रातील विद्यार्थी हुशार व अभ्यास करणारा आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रश्नांसाठी काही भूमिका मांडायची होती तर त्यांनी राज्य सरकारकडे मांडायला हवी होती’, असे मत मांडले.
एवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थी रस्त्यावर येण्यामागे एखादी शक्ती असावी अशी शंका व्यक्त करत जाणीवपूर्वक असे घडवून आणण्याचा प्रयत्न होत असल्याचे प्रतिपादन गृहमंत्र्यांनी केले.
याविषयी पोलीस विभागाला आदेश देण्यात आले असून मागील दोन दिवसांपासून या प्रकरणात सुरू असलेल्या सर्व गोष्टींचा तपास केला जाईल. हे कृत्य कोणत्या संघटनेकडून ठरवून करण्यात आले आहे का याची शहानिशा करून, याचा पूर्णपणे छडा लावून योग्य ती कारवाई केली जाईल, असे गृहमंत्री म्हणाले.
विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर मा. मुख्यमंत्री आणि शालेय शिक्षणमंत्री योग्य मार्ग काढतील. विद्यार्थ्यांच्या हिताची काळजी सरकारला आहे. यामध्ये सरकार निश्चितपणे मदत करण्याची भूमिका घेईल. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
याचसोबत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना चर्चेसाठी येण्याचे आवाहन केले आहे.यातूनही चर्चेने मार्ग निघू शकतो असे मतही वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केले आहे.