मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कथन केले फोटोग्राफितील थरारक रोमांचकारी अनुभव

मुंबई- राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोटोग्राफिचा छंद असून ते एक उत्कृष्ट फोटोग्राफर आहेत.सुमारे १९९७ पासून त्यांनी जंगलात जाऊन फोटोग्राफीला सुरवात केली. त्यांनी राज्याचे माजी आरोग्य मंत्री डाॅ.दीपक सावंत यांच्या उध्दव ठाकरे -द टायगर आणि वाईल्ड लाईफ फोटोग्राफी या दोन पुस्तक प्रकाशन सोहळ्याला ऑनलाईन उपस्थित राहून आपल्या सुमारे २० मिनीटांच्या भाषणात त्यांना आलेले फोटोग्राफितील थरारक रोमांचकारी अनुभव त्यांनी कथन केले.
या दोन पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच शिवसेना नेते व राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई याच्या हस्ते विलेपार्ले पूर्व येथील केशवराव घैसास सभागृहात कोविड नियमांचे पालन करून संपन्न झाले.यावेळी प्रसिद्ध छायाचित्रकार मोहन बने प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.या दोन पुस्तकांचे प्रकाशन इंकिंग इनोव्हेशनच्या आनंद लिमये यांनी केले आहे.राजकारण विरहीत हे पुस्तक असून मुख्यमंत्र्यांची एक वेगळी प्रतीमा मांडण्याचा प्रयत्न डॉ.दीपक सावंत यांनी केला असून यांत मुख्यमंत्र्यांच्या स्वभावाचे वेगळेपण दिसले आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले की,जंगलात फोटोग्राफी करताना डॉ.दीपक सावंत हे माझ्या बरोबर होते.जंगलात वन अधिकारी आणि येथील नागरिक कठीण परिस्थितीत टेन्शन मध्ये आपले जीवन जगत असतात.एकीकडे वन्यजीव,साप,विंचू यांचा सामना करतांना त्यांना मलेरिया,टायफॉईड यांचा सामना करावा लागतो. त्यांच्यासाठी मी व डॉ.दीपक सावंत हे औषधांसह वैद्यकीय पथक घेऊन गेलो. त्यावेळी प्रथमच कोणी येऊन आपली आरोग्य तपासणी केल्या बद्धल त्यांचा अनुभव गगनात मावेनासा झाला.यावेळी डॉ.सावंत यांच्या माणूसकीचे दर्शन दिसले असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
डॉक्टर तुम्ही मला फोटोग्राफितले गुरू मानता हा तुमचा मोठेपणा आहे.सगळा जंगल प्रवास आणि घटना तुम्ही लेखणीतून साकार केल्याने या घटना ताज्या वाटतात. कॅमेरा कसा धरायचा,फोटो कसा क्लिक करायचा ही कला डॉ.सावंत यांच्यात आहे.तुम्ही कॅमेऱ्यातून जंगल टिपले आणि तुम्ही ते लेखंणीत शब्दबद्ध केले.या पुस्तकातून तुमच्यातील एक साहित्यिक दिसला असून तुम्ही उत्तम साहित्याची निर्मिती केली असे गौरवोद्गार मुख्यमंत्र्यांनी काढले.
एकदा जंगलात उघड्या जीपमधून फोटोग्राफी करत वाघ पुढे पुढे येत होता. एक वाघीण अगदी जीपला घासून पुढे गेली.मी मात्र घाबरलो होतो.मात्र त्या वाघीणीने मागे वळूनसुद्धा बघितले नाही.कारण टायगर उद्धव ठाकरे होते असे सांगताच उपस्थितांमध्ये हस्याचे फवारे उडले.आपण त्यांना डिस्टर्ब केले नाही तर ते सुद्धा आपल्याला डिस्टर्ब करत नाही.प्रत्येकाची देहबोली ओळखता आली पाहिजे असे उद्धव ठाकरे म्हणाले.
एकदा जंगलात फोटोग्राफी करतांना मधमाश्यांचे पोळ्यां मधून मधमाश्या उडाल्या.आम्ही कसा बसा बचाव केला.दुसऱ्या वेळी जर असा प्रसंग उदभवला तर यावर कोणती इंजक्शन आहेत याची माहिती घेऊन डॉ.सावंत यांनी ती सोबत घेतली अशी माहिती त्यांनी दिली.
उद्योगमंत्री सुभाष देसाई म्हणाले की,२०१० साली महाराष्ट्राचा सुवर्ण महोत्सवा निमित्त शिवसेनाप्रमुखांच्या आदेशानुसार गोरेगावाच्या नेस्को संकुलात रक्तदानाचा महायज्ञ करून २५०६५ रक्तपिशव्या संकलन करण्याचा गिनीज बुक ऑफ वर्ड रेकॉर्डचा विक्रम शिवसेनेने केला ते डॉ.दीपक सावंत यांच्यामुळे शक्य झाले.एक चांगले डॉक्टर, कोणतेही काम करतांना झोकून देऊन काम करणारा सामाजिक कार्यकर्ता असलेले डॉ.दीपक सावंत यांची आता लेखक म्हणून नवीन ओळख दिसून आली आहे.तुमचे पुस्तक वाचल्यावर भावले असून तुम्ही एक कसलेले लेखक म्हणून आपले म्हणणे मांडले असून मोठे साहित्यिक म्हणून तुमचा गौरव होईल असे मत त्यांनी व्यक्त केले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बरोबर अनेक वेळा फोटोग्राफीला जातांना त्यांनी फोटोग्राफी कला आत्मसात केली.त्यांच्या बरोबर फोटो काढायला मिळणे हे मोठे भाग्य असून हा मोठा ठेवा आहे असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
उद्धव ठाकरे यांनी फोटोग्राफीचा छंद जपला,त्यांनी जीव ओतून काम केले. आणि जगप्रसिद्ध छायाचित्रकार म्हणून त्यांचा गौरव झाला.त्यांची कामाची तळमळ,चिकाटी,संयम,वाट पाहण्याची वृत्ती या त्यांच्यात असलेल्या गुणांचा त्यांना मुख्यमंत्रीपदी उपयोग झाला असे गौरवोद्गार मंत्री सुभाष देसाई यांनी यावेळी काढले.
आपल्या मनोगतात डॉ.दीपक सावंत यांनी, फोटोग्राफी करतांना त्यांनी प्रत्येकाची काळजी घेत त्यांच्यातील माणूस मी जवळून बघितला.टाईफॉईडची लस प्रत्येक वन अधिकाऱ्यांना दिली. ताडोबा जंगलाचे रूपडे पालटले. पेंडीअँटीक ऑन व्हील ही संकल्पना गावागावात पोहचवली. त्यांचे फोटोग्राफीचे अचूक टायमिंग आणि क्लीक आत्मसात केली. त्यांची फोटोग्राफी वॉच करत हे पुस्तक साकार झाले.जंगल व वन्य जीव वाचला पाहिजे हा ध्यास घेत त्यांनी जंगल कसे सुधारतील याची काळजी घेतली.जंगल भ्रमंती करतांना आपल्याला उद्धव ठाकरे कसे भावले याचे वर्णन व चित्रण आपण या पुस्तकांमधून केले असल्याचे त्यांनी सांगितले.राजकरणात आपल्याला संधी मिळावी अशी अपेक्षा त्यांनी शेवटी व्यक्त केली.