अनिल देशमुखांविरोधातील जबाब मागे घेण्यासाठी सचिन वाझेला तुरुंगात शिवीगाळ, परमबीर सिंगांचा नवा बॉम्ब

मुंबई :- मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी खंडणी वसूलीचा गंभीर आरोप केला होता. या आरोपांप्रकरणी ईडीचा तपास सुरु आहे. पण या प्रकरणाचा तपास जसजसा पुढे जातोय तसतसे आणखी नव्या काही गोष्टी समोर येत आहे.
परमबीर सिंग यांनी ईडीला दिलेल्या जबाबात निवृत्त एपीआय सचिन वाझेला पुन्हा सेवेत रुजू करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा अनिल देशमुखांवर दबाव होता, असा आरोप केला होता. तसेच आपल्याला पुन्हा सेवेत घेण्यासाठी अनिल देशमुखांनी २ कोटी रुपये मागितले होते, असं सचिन वाझेने आपल्याला सांगितलं होतं, असा दावा परमबीर सिंग यांनी केला होता.
या जबाबाची चर्चा ताजी असतानाच आता परमबीर यांनी नवा बॉम्ब फोडला आहे. अनिल देशमुखांकडून तुरुंगात सचिन वाझेला शिवीगाळ केली जात असल्याचा दावा परमबीर सिंग यांनी ईडीला दिलेल्या जबाबात केला आहे. काही दिवसांपूर्वी चांदीवाल आयोगाच्या कार्यालयात सुनावणीसाठी अनिल देशमुख आणि सचिन वाझे एकाच वेळी गेले होते. त्यावेळी दोघांमध्ये काही वेळ बातचित झाली होती, अशी ओझरती माहिती समोर आली होती.
दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली होती, याबाबत स्पष्ट अशी काहीच माहिती समोर आली नव्हती. पण दोघांमध्ये चर्चा झाली होती, ही बातमी मात्र फुटली होती. याच माहितीचा पदर घेत परमबीर सिंग यांनी नवा दावा केला आहे. सचिन वाझेने ईडीला जो जबाब दिला आहे तो जबाब मागे घ्यावा यासाठी अनिल देशमुखांनी त्याच्यावर दबाव टाकला जात आहे, असा गंभीर आरोप परमबीर सिंग यांनी केला आहे.





