आता अंगणवाडी केंद्रातच काढा मुलांचे आधार कार्ड,महिला बालविकास विभागाचा उपयुक्त निर्णय

नांदेड :- आधारकार्डची गरज आज प्रत्येकाला लागत आहे. त्यामुळे मुलांचे आधारकार्ड आता अंगणवाडीतच काढण्याचा निर्णय राज्याच्या महिला व बालविकास विभागाने घेतला आहे. यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याला ३ या प्रमाणे ४८ बायोमेट्रीक यंत्रे मिळणार आहेत.
लवकरच मुलांचे आधारकार्ड काढण्याचे काम अंगणवाडी केंद्रात सुरू होणार आहे.राज्यातील काही मुलांचे आधारकार्ड काढण्याचे काम पूर्ण झाले उर्वरित सर्व मुलांचे आधारकार्ड आता अंगणवाडीमध्येच काढले जाणार आहे.
जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात तीन यंत्रे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. हे यंत्र इन्स्टॉल करण्याचे कामही हाती घेतले जाणार आहे. नाशिकच्या एका कंपनीला हे काम सोपविण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यात अंगणवाडीमध्येच मुलांचे आधारकार्ड प्राप्त होणार आहे. हे आधारकार्ड मुलांना प्रत्येक कामासाठी भविष्यात उपलब्ध ठरणार आहे.
केंद्र शासनाने प्रत्येक योजनेसाठी आधारकार्ड बंधनकारक केले आहे. हीच बाब लक्षात घेता, राज्याच्या महिला व बालविकास विभागाने अंगणवाडीतच मुलांना आधारकार्ड देण्याचा निर्णय घेतला व जास्तीत जास्त अंगणवाडीमध्ये नोंदणीकृत असलेल्या सदस्यांनी याचा लाभ घ्यावा असे देखील आवाहन महिला व बाल विकास विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.