आरोपीकडेच मागितली पन्नास लाखांची लाच, चेंबूरमधील महिला पोलिस अधिकाऱ्यांसह तिघांविरोधात गुन्हा दाखल

मुंबई:- मुंबईच्या चेंबूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. फसवणुकीच्या खोट्या गुन्ह्यात अडकवून जामिनासाठी पन्नास लाखांची मागणी केल्याच्या आरोपाखाली महिला पोलीस निरीक्षक शालिनी शर्मा यांच्यासह तिघांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आरोपाचा सध्या पोलीस गुन्हे शाखा तपास करत आहे.
यापूर्वीही शालिनी शर्मा यांनी २५ लाख रुपये उकळण्याचा आरोप तक्रारदार महिलेने केला आहे. चेंबूर परिसरात राहणाऱ्या ३२ वर्षीय तरुणीने केलेल्या आरोपानुसार, त्यांचा वडिलोपार्जित मालमत्तेबाबत कोर्टात कौटुंबिक वाद सुरू आहे. दुसरीकडे याच मालमत्तेच्या सेटलमेंटसाठी चेंबूर पोलिसांकडून दबाव वाढला आहे. याच दबावामुळे शालिनी शर्मा यांनी संबंधित तरुणीच्या भावाला फसवणुकीच्या खोट्या गुन्ह्यात अडकवून जाण्यासाठी पैशाची मागणी केली आहे.
यासंबंधीचे व्हिडीओ रेकॉर्डिंग गुन्हे शाखेच्या कक्ष ६ कडे या तरुणीने दिले असून गुन्हे शाखा याचा अधिक तपास करत आहे. दरम्यान पोलीस निरीक्षक शालिनी शर्मा या चेंबूरमधील धडाकेबाज महिला पोलिस अधिकारी म्हणून ओळखल्या जातात. मात्र, त्यांच्यावर खंडणीचा आरोप लागल्याने खळबळ उडाली आहे.