आंगणेवाडी जत्रा आणि होळी सणासाठी कोकण रेल्वे सोडणार मुंबई ते सावंतवाडी दरम्यान १० विशेष गाड्या..

सिंधुदुर्ग:- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध आंगणेवाडीची जत्रा आणि होळी चा सण काहीच दिवसांवर येऊन पोहोचला आहे.श्री भराडी देवीची जत्रा ही कोकणवासीयांसाठी पर्वणी असते.तर होळी हा सण कोकणकरांसाठी अत्यंत प्रिय . अशात या दोन्ही सण-उत्सवाची जय्यत तयारी कोकण रेल्वेनेही केली आहे.
मध्य रेल्वेच्या सहकार्याने कोकण रेल्वेने आंगणेवाडी जत्रा आणि होळी सणाच्या पार्श्वभूमीवर तब्बल १० विशेष गाड्या सोडणार असल्याची घोषणा केली आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन वर्षांपासून आंगणेवाडीची जत्रा रद्द करण्यात आली होती.मात्र,यंदा २४ फेब्रुवारीला ही जत्रा मोठ्या उत्साहात भरणार आहे.
यात्रेची तारीख जाहीर झाल्याने भविकांनी कोकणात जाण्यासाठी चाकरमानी आणि पर्यटकांनी रेल्वेचे बुकींग सुरू केले आहे. महाराष्ट्रातून हजारो भाविक आंगणेवाडीच्या यात्रेला जात असतात. दरम्यान होळीचा सण देखील जवळ येत आहे.त्यामुळे प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वे लोकमान्य टिळक टर्मिनस / दादर ते सावंतवाडी दरम्यान आंगणेवाडी जत्रा आणि होळीच्या धर्तीवर १० विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.