
(महेश पावसकर )
महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व पु.ल.देशपांडे यांच्या एकेकाळी दूरदर्शन वरून प्रचंड गाजलेलया ‘वाऱ्यावरची वरात’ या कार्यक्रमात ‘दारू म्हणजे काय रे भाऊ?’ हे भन्नाट प्रहसन पुलंनी अत्यंत विनोदी पद्धतीने साभिनय सादर केलं होतं. यात एकमेकांचे भाऊ असलेल्या दोन शालेय विद्यार्थ्यांमधील संवाद त्यांनी पेश केला होता. दारू म्हणजे नक्की कसले पेय असते? हे विचारताना लहान भाऊ मोठ्यास विचारतो की दारू हे पेय दुधासारखे असते का ? तेव्हा मोठा भाऊ जीभ चाऊन म्हणतो *”अरे नव्हे रे नव्हे,दारू आणि दुधात जमीन अस्मानाचा फरक आहे “*
हे वाक्य प्रकर्षाने आठवण्याचे कारण म्हणजे किराणा दुकानातून व सुपर मार्केटमधून वाईन विक्रीच्या आघाडी सरकारच्या निर्णयाचे समर्थन करताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी *”दारू आणि वाईन मध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे”* हे वाक्य उच्चारले.या त्यांच्या उद्गारामुळे वाईन ला दुधाच्या समकक्ष दर्जा आगामी काळात मिळू शकेल अशी शक्यता निर्माण झालेली आहे असे कुणी म्हटले तर ते वावगे ठरणार नाही.
आता किराणा मालाच्या दुकानात साखरेच्या पोत्याशेजारी वाईन चे लागलेले बॉक्स बघता सरकारने जुळवून आणलेला हा जणू “वाईन शर्करा योग’ आहे,असे आज पुल असते तर त्यांनी नक्कीच म्हटले असते.
वाईन विक्रीमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात जर घसघशीत वाढ होत असेल, तर मग ही मर्यादा फक्त सुपरमार्केट मध्येच किंवा १००० चौरस फूट एवढे क्षेत्रफळ असलेल्या किराणा मालाच्या दुकानांमधूनच का ? राज्य सरकार जर शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढी बाबतीत एवढे संवेदनशील आहे तर राज्यातील सर्वच दुकानातून अगदी पान टपऱ्यांवरून देखील वाईन विक्रीची परवानगी दिली गेली पाहिजे. यामुळे वाईन विक्री वाढेल. वाईन विक्रीचा परवाना सर्वच दुकानांना मिळाला तर त्या परवान्यापोटी कित्येक कोटी रुपयांची भर सरकारी खजिन्यात पडेल.व यामुळे शेतकरी खुश व सरकारी खजिन्यात प्रचंड महसूल जमा होईल. आज मंत्रालयात व सरकारी कार्यालयातून चालणाऱ्या सरकारी व खासगी बैठकांमध्ये चहा नाश्त्याला फाटा देऊन वाईन च्या छोट्या छोट्या बाटल्या दिल्या तर कामे अजून जोमाने होतील. उत्साहाचा धबधबा जणू वाहू लागेल. आज सरकारी कचेऱ्यांमधला टायपिस्ट जो दिवसामाजी एखादे पत्र टाईप करतो तो धडाधड वीस पंचवीस पत्रे टाईप करील. दुपारी लंच टाइम नंतर अर्धा-एक तास पाय मोकळे करायला जाणारे कर्मचारी वाईन सारखे आरोग्यदायी पेयांचे सेवन करते झाले तर ऑफिस मध्येच ताजेतवाने होतील.शासकीय कामकाजाचे कितीतरी तास वाचतील. वाईन मधल्या प्रथिनांचा परिणाम म्हणून इतके सारे फायदे मिळायला लागले तर ते चांगलेच नव्हे काय? ‘वाईन घेणारे प्रशासन,गतिमान प्रशासन’ असे बोर्ड लागतील.केंद्रीय कार्यालयांमधून पूर्वी एक बोर्ड हमखास दिसायचा ‘हिंदी में काम करना आसान है.. शुरू तो किजीये’ या धर्तीवर आता राज्यसरकारी कार्यालयातून *‘वाईन लेके काम करना आसान है, शुरू तो किजीये’* असे बोर्ड लागले तर त्यात कुणी वाईट वाटून घेण्याचे कारण नाही…
चहा,कॉफी चे व्यसन लागले तर चालते तर मग वाईन चे व्यसन लागले तर काय चुकले ? वाईन हे एक आरोग्यदायी पेय आहे असा शिक्का बसल्यावर तर शाळाशाळांमधून पोषण आहारामध्ये वाईन चा समावेश केला तर काय बिघडते ?
दुधाचा महापूर ही योजना काही वर्षांपूर्वी महाराष्ट्र शासनाने राज्यात लागू केली होती. या योजनेमुळे महाराष्ट्रात धवल क्रांती झाली. महाराष्ट्रातल्या तालुक्या तालुक्यात आणि जिल्ह्याजिल्ह्यात दूध संघ स्थापन झाले. दूध शीतकरण केंद्रे झाली, याच दूध संघानी पुढे आपल्या नावाचे दुधाचे ब्रँड बाजारात आणले. महाराष्ट्रात आता दुग्ध व्यवसायाने चांगलाच जम बसविला आहे. ‘दुधाचा महापूर’ याच धर्तीवर जर ‘वाईन चा महापूर ‘ ही योजना शासनाने जाहीर केली तर महाराष्ट्रातील ‘शेतकऱ्यांचे कोटकल्याण होईल.. गावागावातून वाईन संघ निर्माण होतील.. दुधाच्या टँकर्स सोबत वाईन चे टँकर्स देखील मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावरून आणि तोपर्यंत पुरा झालाच तर मुबई गोवा महामार्गावरून देखील दुधाच्या टँकर्सना मागे टाकून गोव्याच्या दिशेने धावू लागतील… गोव्यातील पर्यटकांना महाराष्ट्रात तयार झालेली अस्सल देशी वाईन मिळू लागेल..
ज्या ठिकाणी वाईन चा पुरवठा होण्यासाठी रस्ते मार्ग नसतील तिथे विमानमार्गे वाईन टँकर्स पोहोचवता येतील.. एकुणातच महाराष्ट्रात आता शासनाने वाईन च्या बाटलीच्या दिशेने (न अडखळता )टाकलेले पाऊल हे दूरगामी परिणाम करणारे ठरणार आहे..हे निश्चित. तेव्हा विरोधी पक्षाने देखील केवळ विरोधासाठी विरोध न करता शासनाच्या या निर्णयाला पाठिंबा द्यावा.. सर्वसामान्य जनतेने (जिला कधी कोण विचारतो ) देखील उगा गळा न काढता महाराष्ट्र सरकारच्या या अत्यंत धोरणी व तमाम महाराष्ट्राला श्रीमंत करणाऱ्या धोरणाला विरोध करू नये आणि असा शासनमान्य ‘वाईन शर्करा योग’ आणल्याबद्दल महाभारतातल्या संजयासारखी दूरदृष्टी लाभलेल्या आघाडी सरकार चे आभार मानावेत तसेच सरकारला अभिप्रेत असलेल्या ‘मेहनती शेतकऱ्यांच्या’ उत्पन्नात आपला वाटा जमा करण्यासाठी जवळच्या वाईन शॉप मधून वाईन ची बाटली आणून सुजलाम सुफलाम महाराष्ट्राची स्वप्ने पाहण्यात धुंद व्हावे..