अजित पवार यांनी आयुष्यभर जमिनी लाटण्याचं काम केलं म्हणत चंद्रकांत पाटीलांनी अजित पवारांना डिवचलं
पुणे:- भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.अजित पवार यांनी आयुष्यभर पैसे काढून घेण्याचं, जमिनी लाटण्याचं काम केलं. अजित पवार हे हेलिकॉप्टरने जमिनी शोधत असतात, कुणाची जमीन शिल्लक आहे. अजित पवार धरणाची जमीनही सोडत नाहीत. लोकांमध्ये अजित पवारांची भीती आहे, अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांनी अजितदादांवर गंभीर आरोप केले आहेत.
चंद्रकांत पाटील हे आज पुण्यातील मांजरी या गावात कार्यकर्ते मेळाव्यात बोलत होते. यावेळी त्यांनी हे गंभीर आरोप केले आहेत. चंद्रकांत पाटलांनी केलेल्या या आरोपामुळे भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा वाद रंगण्याची चिन्ह आहेत.
चंद्रकांत पाटील यांनी गंभीर आरोप केल्यामुळे आता अजित पवार नेमकं काय उत्तर देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. कारण पुणे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर या दोन्ही नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. यापूर्वी अजित पवारांनी अनेकदा चंद्रकांत पाटील यांचा ‘चंपा’ असा उल्लेख करत त्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला होता. तर पाटलांच्या अनेक आरोपांना उत्तर न देता आपण त्यांना महत्व देत नसल्याचं अजित पवारांनी सुचवलं होतं. मात्र, आता जमिनी लाटण्याच्या आरोपांना अजित पवार काय उत्तर देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.