खासदार संजय राऊतांनी लिहिलेल्या पत्राने राजकारणात खळबळ, महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी मदत करावी यासाठी धमकी आल्याचा केला दावा

मुंबई- शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राज्यसभेचे अध्यक्ष तथा उपराष्ट्रपती वैकय्या नायडू यांच्यासह राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस नेते राहुल गांधी आणि अन्य काही नेत्यांना पत्र लिहून राज्यातील शिवसेना नेत्यांना आणि त्यांच्या नातेवाईकांना ‘ईडी’ सांरख्या संस्थेचा वापर करून तपास यंत्रणांकडून त्रास देण्यात येत असल्याचे खळबळजनक आरोप केले आहेत. राऊत यांनी पत्राचा फोटो ट्विटरवर शेअर करत ‘सत्यमेव जयते’ म्हटलं आहे.
‘महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार पाडण्यास मदत न केल्यास तुम्हालाही लालूप्रसाद यादव यांच्याप्रमाणे तुरुंगात पाठवू अशी धमकी मिळाल्याचा खळबळजनक आरोप राऊतांनी आपल्या पत्रात केला आहे.शिवसेनेचे खासदार संजय राऊत आपल्या पत्रात म्हटले आहे की, ‘महिन्याभरापूर्वी, काही लोकांनी माझ्याशी संपर्क साधला आणि महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी आम्हाला मदत करा’ असे सांगितले. राज्याला मध्यावधी निवडणुकांत ढकलण्यासाठी मी महत्त्वाची भूमिका बजावावी अशी त्यांची इच्छा होती. मी अशा कोणत्याही गुप्त अजेंड्याचा भाग होण्यास नकार दिला, त्यावर माझा नकार मला महागात पडू शकतो असा इशारा देण्यात आला होता. मला असेही सांगण्यात आले होते की, माझे पुढचे दिवस अनेक वर्षे तुरुंगात घालवलेल्या माजी केंद्रीय रेल्वे मंत्री लालूप्रसाद यादव यांच्यासारखे असू शकतात.
पुढे ते म्हणाले, ‘मला असा इशाराही देण्यात आला होता की, जर महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी आम्हाला मदत केली नाही तर राज्यातील दोन कॅबिनेट मंत्री आणि दोन वरिष्ठ नेत्यांनादेखील पीएमएलए कायद्याखाली तुरुंगात टाकण्याची धमकी देखील देण्यात आली होती, ज्यामुळे राज्यात मध्यावधी निवडणुका होतील’, असा खळबळजनक दावा त्यांनी केला आहे.
‘माझ्या मुलीच्या लग्नात काम देण्यात आलेल्या व्हेंडर्सना त्रास देण्याचं काम ईडीकडून सुरू आहे. लेकीच्या लग्नात डेकोरेशनचं काम केलेल्या लोकांना ५० लाख रुपये देण्यात आल्याचं वदवून घेण्याचा ईडीचा प्रयत्न आहे’, असं राऊत यांनी पत्रात नमूद केलं आहे.
२००३ मध्ये लागू झालेल्या मनी लाँडरिंग कायद्याकडे लक्ष वेधून त्यांनी आरोप केला की ईडी आणि इतर केंद्रीय एजन्सी एका पक्षाच्या राजकीय प्रतिस्पर्ध्यांना धमकावण्यासाठी आणि त्रास देण्यासाठी त्याचा वापर करत आहेत असाही आरोप राऊतांनी केला आहे. अंमलबजावणी संचालनालयाचे कर्मचारी आमच्या खासदारांना, नातेवाईकांना, तसेच मित्रांना ते धमकावण्यात कोणतीही कसर सोडत नाही, पण आम्ही “झुकणार नाही आणि सत्य बोलत राहील’, असं राऊत म्हणाले आहेत.