पालकमंत्री अदिती तटकरे याच्या मनमानी कारभारा विरोधात तीन आमदारांची तक्रार

रायगड – महाआघाडीच्या स्थापनेपासूनच रायगड जिल्ह्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कुरबुरी सुरूच आहेत. आदिती तटकरे यांची पालकमंत्रीपदी निवड झाल्यानंतरही शिवसेना आमदारांनी याबाबत जाहीर नाराजी व्यक्त केली होती.अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईत दोन्ही पक्षांच्या जिल्ह्यातील नेत्यांची बैठक घेऊन, एकत्रित येऊन काम करण्याचा सल्ला दिला होता.
पालकमंत्री आदिती तटकरे यांना जिल्ह्याचा कारभार पाहताना शिवसेना आमदारांना विश्वासात घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. माणगावमध्ये शिवसेनेने काँग्रेस आणि भाजपच्या मदतीने राष्ट्रवादी काँग्रेसला रोखले. यामुळे दोन्ही पक्षांतील वाद अधिकच विकोपाला गेले.
खासदार सुनील तटकरेंनी शिवसेनेवर जाहीर टीका केली. त्यामुळे शिवसेनेचे तिन्ही आमदार आता तटकरेंविरोधात एकवटल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. माणगाव येथील नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर आमदार भरत गोगावले यांनी पत्रकार परीषद घेऊन थेट पालकमंत्री बदलण्याची मागणी केली आहे.
पालकमंत्री तटकरे मनमानी पद्धतीने कारभार करत असून शिवसेना आमदारांच्या मतदारसंघात लुडबुड करत आहेत. परस्पर निर्णय घेत आहेत, त्यामुळे आम्ही मुख्यमंत्र्यांकडे ही मागणी करत आहोत,असे सांगितले होते.त्यामुळे आता येत्या काळात याच मुद्द्याला धरून रायगडचं राजकारण तापण्याची चिन्ह आहेत.