ज्येष्ठ कलावंत, साहित्यिकांच्या पेन्शनमध्ये वाढ करा- आमदार सुनील प्रभू यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबई दि. १४ – सध्याच्या व्हॉट्सअॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम अशा सोशल मीडियाच्या जमान्यात समाज गुरफटलेला असताना समाजातील ज्येष्ठ साहित्यिक, कलावंत खर्या अर्थाने समाजप्रबोधनाचे काम करीत आहेत.
मात्र कोरोनाचा फटका आणि महागाई प्रचंड वाढलेली असताना अशा वृद्ध कलाकार, साहित्यिकांना पुरेशी पेन्शन मिळत नाही. त्यामुळे ज्येष्ठ साहित्यिक, कलावंतांच्या पेन्शनमध्ये वाढ करा अशी मागणी आमदार सुनील प्रभू यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. याबाबत प्रभू यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदनही दिले आहे.
मोबाईल, सोशल मीडियाच्या जमान्यात समाजप्रबोधन करणार्या मान्यवर वृद्ध साहित्यिक व कलावंतांच्या माध्यमातून होणारे समाजप्रबोधन प्रभावशाली असून देशाची संस्कृती, परंपरा जपली जात आहे. त्यामुळे अशा वृद्ध साहित्यिक व कलावंतांना लोकाश्रयावरोबरच भक्कम राजाश्रय मिळणे गरजेचे आहे.
विशेषतः कोकणात भजन मंडळी जास्त प्रमाणात आहेत. कोकणात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो. या ठिकाणी प्रसिद्ध भजनी बुवांना सिंगलबारी, तसेच डबलबारी भजनासाठी आमंत्रित केले जाते. या मंडळामध्ये भजनी बुवा टाळ
मृदुंग वाजविणारे तसेच कोरस देणारे ग्रामीण भागात छोटी – मोठी नोकरी करणारे आणि शेती करणारे सर्वसामान्य कुटुंबातील लोक असतात. मात्र मार्च २०२० पासून सुमारे दोन वर्षे कोरोना महामारीमुळे सर्वच क्षेत्रांवर मंदीचे सावट आल्याने या कलावंतानाही या संकटाचा फटका बसला आहे.
२०२० व सन २०२१ मधील गणेशत्सवात भजने न करता आल्याने त्यातून मिळणार्या आर्थिक हातभारापासून ही कुटुंबे वंचीत राहून भजनीबुवांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट झाली असल्याचे प्रभू यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे. प्रभू यांनी याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही पत्र दिले आहे.
५ ते ६ हजारांची वाढ करा
राज्य शासनाने राज्यातील वृद्ध साहित्यिक व कलावंत इत्यादींना मानधन देण्याचा शासन निर्णय सप्टेंबर, २०१९ मध्ये घेतला. या अंतर्गत राष्ट्रीय स्तरावरील कलावंताना दरमहा ३,१५० तर, राज्यस्तरीय कलावंताना दरमहा २,७०० आणि स्थानिक कलावंतांना दरमहा २,२५० पेंशन लागू करण्यात आली आहे.
कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांत राज्यात नाटक, तमाशातील लोककलावंत तसेच भजनीबुवांना कोणतेच कार्यक्रम करता आले नाही. त्यामुळे मिळणार्या अपुर्या पेन्शनमुळे वृद्ध कलावंतांना उदरनिर्वाह करणे अडचणीचे झाले आहे. त्यामुळे शासनामार्फत दरमहा देण्यात येणार्या पेंशनमध्ये जास्तीत जास्त ६००० ते ५००० रुपयाांच्ी वाढ करावी अशी मागणी प्रभू यांनी केली आहे.