वेंगुर्ले तालुक्यातील निवति रॉक जवळील समुद्राच्या तळाचे अंतरंग न्याहाळण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या ताफ्यात आली अत्याधुनिक बोट

सिंधुदुर्ग:- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील साहसी पर्यटनाला चालना देण्यासाठी तसेच स्थानिकांसाठी पर्यटनाच्या संधी निर्माण करून साहसी पर्यटन अधिक रोमांचकारी आणि अत्याधुनिक करण्यासाठी राज्य सरकारने काही पाऊलं उचलली आहेत. पर्यटन विकासाचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन मालवण येथील इंडीयन इन्स्टिट्युट ऑफ स्कुबा डायव्हिंग अँड अॅक्वाटीक स्पोर्टसच्या (इसादा) माध्यमातून वेंगुर्ले तालुक्यातील निवति रॉक जवळीक समुद्राच्या तळाचे अंतरंग न्याहाळण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या ताफ्यात एक अत्याधुनिक बोट दाखल होत आहे.
जल पर्यटनाच्या क्षेत्रात भारतातील पहिली सुसज्ज आणि अत्याधुनिक बोट सामील करण्याचा मान एमटीडीसीला मिळाला आहे.सिंधुदुर्गात आंतरराष्ट्रीय दर्जाचे जल पर्यटन विकसित करण्याच्या योजनेतील हा पहिला टप्पा आहे.
एमटीडीसीच्या जलपर्यटन विभागाचे महाव्यवस्थापक डॉ.सारंग कुलकर्णी हे स्वतः ही बोट घेऊन पुद्दुचेरीहून सागरी मार्गाने मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. मुंबईत पोहोचल्यावर पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते या बोटीचे उद्घाटन करण्यात येणार आहे. त्यानंतर ही बोट सिंधुदुर्गात स्कुबा डायव्हिंगसाठी आणण्यात येणार आहे.