मोठी बातमी-इलेक्ट्रिक व सीएनजी वाहनांपेक्षा स्वस्त हायड्रोजन कार आली: प्रती किमी केवळ ५० पॆसे खर्च..
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते दिल्लीत उदघाटन

नवी दिल्ली: पेट्रोल डिझेल चे गगनाला भिडणारे दर, इलेक्ट्रिक वाहनांच्या आवाक्याबाहेरील किमती या सर्वांच्या पार्श्वभूमी वर देशातील पहिली हायड्रोजन कार चे काल दिल्लीत लॉन्चिंग पार पडले.
केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते ही कार लाँच करण्यात आली. या कारची टाकी हायड्रोजन गॅस ने एकदा फुल्ल केली की ती चक्क 650 किमी अंतर धावते. .
टोयोटाने भारतातील पहिली हायड्रोजन इंधन सेलवर धावणारी ही कार Mirai या नावाने बाजारात आणली आहे. या टोयोटा मिराई कारमध्ये हायड्रोजन इंधन सेल बॅटरी पॅक दिला आहे. विशेष म्हणजे इलेक्ट्रिक कारपेक्षा या वाहनाची रेंज जास्त आहे. ही कार सिंगल चार्जमध्ये ६५० किमी पर्यंत चालत असल्याचा कंपनीचा दावा आहे.
या कारमध्ये हायड्रोजनचे रुपांतर विजेमध्ये होते, ज्यामुळे इंजिनला शक्ती मिळते. यातून फक्त पाणी बाहेर टाकले जाते त्यामुळे ही कार पुर्णपणे पर्यावरण पूरक आहे. कारमध्ये ऑनबोर्ड वीज तयार होते, ज्यावर कार चालवली जाते. कारच्या मागील बाजूस 1.4 kWh बॅटरी बसवण्यात आली आहे. ही बॅटरी इलेक्ट्रिक वाहनापेक्षा 30 पट कमी आहे. एका सिलेंडरमध्ये 5.6 किलो हायड्रोजन भरला जातो. इतक्या इंधनात ही कार 650 किमी प्रवास करते.
टोयोटाने हायड्रोजनवर चालणारी कार फ्यूअल सेल इलेक्ट्रिक व्हीकल्स (FCEV) नुसार ही कार पायलट प्रोजेक्ट म्हणून आणली आहे. ही कार लक्झरी वाहनांमध्ये असणार आहे.
नितिन गडकरी यांच्यासोबत केन्द्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी, महेन्द्रनाथ पांडेय,आरके सिंह आणि टोयोटाचे अधिकारी उपस्थित होते. गडकरी म्हणाले, ही कार कमी खर्चात चालविता येणार आहे. भविष्यात जेव्हा आपल्या देशात हायड्रोजन स्टेशन उभे राहतील तेव्हा दोन किमीसाठी एक रुपयाचा खर्च येणार आहे. एक किलो हायड्रोजनची किंमत एक डॉलर म्हणजेच ७० रुपये आहे. या ७० रुपयात १२० किमीचे अंतर ही कार कापणार आहे. पायलट प्रोजेक्टनंतर या दिशेने वेगाने काम होईल.