ब्रेकिंगक्रीडामुंबई

१५ कोटींची थकबाकी वसूल केल्यानंतरच क्रिकेट सामन्यास सुरक्षा द्यावी

अनिल गलगली यांचे पोलीस आयुक्तांना साकडे

मुंबई:वारंवार पत्र व्यवहार करुनही मुंबई पोलीस थकबाकी पैसे वसूल करण्यासाठी स्वारस्य घेत नाहीत आणि थकबाकीदार मुंबई क्रिकेट असोसिएशनला पुन्हा पुन्हा नवीन क्रिकेट सामन्यासाठी सुरक्षा उपलब्ध करुन देत आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनने मुंबई पोलिसांचे 14.82 कोटी रुपये थकविले असून पोलिसांच्या 35 स्मरणपत्रांना केराची टोपली दाखविली आहे. थकबाकी आधी वसूल केल्यानंतर क्रिकेट सामन्यास सुरक्षा द्यावी, अशी मागणी आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी पोलीस आयुक्त संजय पांडे यांस केली आहे.

मुंबई पोलिस मुंबई क्रिकेट असोसिएशन क्रिकेट सामन्यासाठी सुरक्षा पुरवतात आणि मुंबईतील क्रिकेट सामन्यांसाठी शुल्क आकारले जाते. विविध सामन्यांसाठी आकारलेले 14.82 कोटी रुपये थकीत असून मुंबई पोलिसांनी थकबाकीची रक्कम वसूल करण्यासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनला 35 स्मरणपत्रे पाठविली असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस मुंबई पोलिसांनी दिली आहे.

मुंबई पोलिसांनी गेल्या 8 वर्षातील विविध क्रिकेट सामन्याबद्दल माहिती दिली. या सामन्यांमध्ये वर्ष 2013 मध्ये संपन्न झालेला महिला क्रिकेट विश्वचषक, वर्ष 2016 चा विश्वचषक टी -20, वर्ष 2016 मधील कसोटी सामने, 2017 आणि वर्ष 2018 मध्ये खेळले गेलेली आयपीएल आणि एकदिवसीय सामन्यांचे 14 कोटी 82 लाख 74 हजार 177 रुपये मुंबई क्रिकेट असोसिएशनने अद्याप भरलेले नाहीत. मुंबई क्रिकेट असोसिएशनने गेल्या 8 वर्षात फक्त 2018 च्या आयपीएल क्रिकेट सामन्यासाठी आकारलेले 1.40 कोटीचे शुल्क प्रामाणिकपणे अदा केले आहे. मुंबई पोलिसांनी दावा केला आहे की आतापर्यंत मुंबई पोलिसांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षांना 35 स्मरणपत्रे पाठवली आहेत. तर या थकबाकी रक्कमेवर 9.5 टक्के व्याज आकारले जाणार आहे.

1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2020 या कालावधीत झालेल्या क्रिकेट सामन्यासाठी घेतलेल्या सुरक्षा अंतर्गत शुल्क अद्याप आकारलेले गेले नाही कारण किती शुल्क आकारले जावे यासाठी महाराष्ट्र सरकारने अद्याप आदेश जारी केलेला नाही. मुंबई पोलिसांनी याबाबत गृह विभागाच्या अपर मुख्य सचिवांना 9 वेळा पत्रव्यवहार केला आहे पण ढिम्म गृह खाते प्रतिसाद देत नाही. मी याबाबत पत्रव्यवहार करत असून मुंबई पोलिसांनी अद्यापही ठोस कारवाई न केल्याने मुंबई क्रिकेट असोसिएशन मुंबई पोलिसांना गांभीर्याने घेत नाही.

अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, गृह राज्यमंत्री सतेज पाटील आणि अन्य अधिकारी वर्गास पत्र पाठवून मागणी केली आहे की मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून 14.82 कोटी थकबाकी वसूल न होइपर्यंत कोठल्याही क्रिकेट सामन्याला सुरक्षा न देणे आणि थकबाकी वसुलीसाठी कायदेशीर कारवाई करावी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!