
मुंबई: गेल्या सुमारे १५ दिवसांपासून गोरेगाव येथील आरे भास्कर ते राशी टाॅवर दरम्यान बीएमसी ने रस्ता खोदून काम सुरू केल्याने येथील लक्षधाम, रायन इंटरनॅशनल,झेवीयर तसेच महापालिका शाळा अशा एकूण चार शाळांत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच त्यांना ने आण करणाऱ्या पालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
येथील रस्ता खोदून काम सुरु असल्याने सदर रस्ता हा पूर्वीपेक्षा निम्मा झाला आहे. ज्यात मुश्किलीने एखादी रिक्षा व दुचाकी जाऊ शकते. अशा वेळेस येथे पोलीस किंवा प्रशासनाने कोणतीही व्यवस्था न केल्याने मोठमोठ्या बसेस,ट्रक यांची मोठया प्रमाणावर दोन्ही मार्गाने ये जा सुरु असते.
वर उल्लेख केलेल्या चारही शाळांच्या भरण्याच्या व सुटण्याचे वेळेस सकाळी ६.३० ते ८ , दुपारी १२ ते २ तसेच सायंकाळी ६ ते ७.३० या दरम्यान प्रचंड वाहतूक कोंडी होऊन या कोंडीत विद्यार्थ्यांना व पालकांना प्रचंड मनस्ताप भोगावा लागत आहे.या शाळांत शिकणाऱ्या मुलांना यामुळे शाळेत वेळेवर पोहोचणे खूपच कठीण झाले आहे. त्यातच काही शाळांच्या वार्षिक परीक्षा सुरु असल्याने वेळेवर न पोहोचल्याने विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कित्येकदा येथे मोठे बसचालक /ट्रक चालक व इतर दुचाकीस्वारांमध्ये हाणामारी होण्याचे प्रसंग उद्भवत आहेत.
यावर सकाळी शाळा भरण्याच्या वेळेत व सुटण्याचे वेळेत (सकाळी ६.३० ते ८ , दुपारी १२ ते २ तसेच सायंकाळी ६ ते ७.३०) या रस्त्यांवरून ट्रक,टेम्पो व बसेस ची वाहतूक काही काळात बंद ठेवल्यास तसेच या वेळात फक्त दुचाकी व रिक्षा यांना रस्त्यावरून वाहतुकीची परवानगी दिल्यास शाळकरी विद्यार्थी व त्यांना ने आण करणाऱ्या पालकांचा मोठा मनस्ताप टळू शकतो.
याबाबत पोलीस व प्रशासनाची दुर्लक्ष करण्याची सवय कायम राहिल्यास येथे काही अनावस्था प्रसंग घडून मोठे जनआंदोलन उभे राहण्याची शक्यता आहे.