
सिंधुदुर्ग:मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अजूनही अपूर्ण आहे. काम अपूर्ण असताना टोल वसुली योग्य नाही. नागरिकांच्या संतप्त भावना लक्षात घेवून टोल वसुली करू नये. तसेच रत्नागिरी (एम.एच.०८) आणि सिंधुदुर्ग (एम.एच. ०७) या दोन्ही जिल्ह्यातील वाहनचालकांना टोल माफी असावी, अशी मागणी प्राधिकरणाकडे केली आहे. महामार्गाचे काम अधिक वेगाने व्हावे आणि टोल वसुलीसंदर्भात लवकरच केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्यासह अन्य मंत्र्यांची भेट घेणार आहेत, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली.
मुंबई-गोवा या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम पूर्ण नसताना एजन्सीने सावंतवाडी आणि राजापूर येथे टोल वसुली सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र दोन्ही ठिकाणी याला तीव्र विरोध झाल्याने तूर्तास टोल वसुली रद्द केली आहे. यावर बोलताना उदय सामंत म्हणाले, महामार्गाचे काम अपूर्ण असताना एजन्सीकडून टोल वसुली करणे योग्य नाही. हा वाहनधारकांवर अन्याय आहे. ही वसुली थांबवावी अशी आमची मागणी आहे. महामार्गावरील परशुराम घाटाचे काम ४० टक्के पूर्ण झो आहे. पावसाळ्यात हा घाट बंद राहणार नाही. दरड कोसळून जीवितहानी होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना एजन्सीला दिल्या आहेत.
एवढेच नाही तर आंबा घाटातही गेल्यावर्षी मोठ्या प्रमाणात दरड कोसळली, काही महिने हा घाट वाहतुकीसाठी बंद ठेवावा लागला. प्रतिकूल परिस्थितीतही घाटाच्या दुरूस्तीचे काम सुरू ठेवले. यंदा अतिवृष्टी झाली तर दुरूस्ती केलेला भाग पुन्हा खचणार नाही, असे सांगता येत नाही. त्यामुळे तेथे दक्षता घेण्यास सांगितले आहे.