मुंबईवैद्यकीय

शताब्दी रुग्णालयाचा होणार कायापालट !

आ. भातखळकर यांच्या प्रश्नाला मुख्यमंत्र्यांची सकारात्मक दाद..

नागपूर, दि. 20 (प्रतिनिधी):भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय (शताब्दी) रुग्णालायात सर्वसामान्य, गोरगरीब जनतेची गैरसोय होत असून यावर आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आमदार अतुल भातखळकर यांनी मंगळवारी तारांकित प्रश्नाद्वारे केली. याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच या संदर्भात बैठक घेऊन मुंबईकरांच्या आरोग्यासाठी जे-जे करावे लागेल ते सर्व पूर्ण करणार असल्याचे आश्वासन दिले.

उपनगरातील अत्यंत महत्वाचे असलेल्या या रुग्णालयात अतिरिक्त शास्त्रक्रिया विभाग सुरु करावा, पदभरती करावी, औषधे उपलब्ध करून द्यावीत यासह विविध मागण्या आमदार भातखळकर यांनी केल्या. सोयी सुविधांचा अभाव असल्यामुळे सामान्य रुग्णाला केईएम, सायन रुग्णालयात जावे लागते. यावरील उपाययोजनांसाठी कालबद्ध धोरण ठरवण्यासाठी बैठक घ्यावी, अशी मागणीही आमदार भातखळकर यांनी केली.

या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, आमदार भातखळकर यांनी उपस्थित केलेला रुग्णालयाचा प्रश्न हा अत्यंत महत्त्वाचा आहे. या रुग्णालयात आवश्यक त्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध करण्याकरिता कार्यवाही करू. मुंबईकरांचे आरोग्य उत्तम कसे राहील हे पाहण्याची जबाबदारी सरकारची आहे. यापूर्वीच्या सरकारने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे अशी अवस्था निर्माण झाली आहे. लवकरच यासंदर्भात आमदार, संबंधित अधिकारी यांची बैठक घेऊन रुग्णालयाचा प्रश्न सोडवण्यासाठी जे-जे म्हणून करावे लागेल ते सर्व करू, असे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!