
रत्नागिरी दि.15 (प्रतिनिधी) दक्षिणेतील सुपरडुपर हिट आरआरआर चित्रपटातील नाटू नाटू या अफलातून गीताला ओरिजनल सॉंग प्रकारात सर्वोच्च ऑस्कर पुरस्काराने गौरवण्यात आले. आरआरआर चित्रपटाच्या यशात रत्नागिरीतील रोहन राणे यांचा सहभाग रत्नागिरीवासियांसाठी अभिमानाची बाब ठरली आहे.
कोणत्याही चित्रपटाच्या यशात त्या चित्रपटाचे मार्केटींग महत्वाचे मानले जाते. चित्रपटाचे प्रदर्शित होणारे प्रोमे यशाचे पहिले गणित सोडवत असतात. दिग्दर्शक राजामौली यांनी या चित्रपटाचे मार्केटींग मॅक्स मार्केटींग कंपनीकडे सोपवले होते. मॅक्स फिल्म मार्केटींग कंपनीची धुरा मार्केटींग ऍण्ड क्रिएटीव्ह हेड म्हणून रत्नागिरीचे रोहन यश राणे आणि फाऊंडर डायरेक्टर वरूण गुप्ता सांभाळतात. भारतीय चित्रपटाला सर्वोत्कृष्ट ओरिजनल सॉंगसाठी मिळालेला हा पहिलाच पुरस्कार आहे. त्यामुळे भारतीयांची मान अभिमानाने उंचावली असतानाच यामध्ये रत्नागिरीकर रोहन राणे यांच्या योगदानामुळे रत्नागिरीकरांनाही विशेष अभिमान वाटत आहे.