शेळ्या-मेंढ्या कुणाच्या? न्यायालयीन प्रक्रियेत 1800 शेळ्या मृत्यूमुखी..

रत्नागिरी (प्रतिनिधी)रत्नागिरीच्या समुद्रातून अवैध रित्या निर्यात करत असताना जप्त करण्यात आलेल्या शेळ्या-मेंढ्यांसाठी त्यांचा मालक व एनजीओ यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे शेळ्या-मेंढ्यांचा ताबा मिळविण्यासाठी दोन्ही बाजूकडून न्यायालयात दावा करण्यात आला आहे. दरम्यान न्यायालयीन लढाईत जप्त करण्यात आलेल्या शेळ्या-मेंढ्यांचा मृत्यू होत असल्याने मोठे नुकसान मालकाला होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
कस्टम विभागाने रत्नागिरीच्या समुद्रात सुमारे साडेतीन हजार शेळ्यामेंढ्या जप्त केल्या होत्या. यावेळी जप्त करण्यात आलेल्या या शेळ्यांची माहिती रत्नागिरी येथील मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्यापुढे ठेवण्यात आली. यावेळी एका एनजीओने या शेळ्या मालकाकडे न देता त्यांचा ताबा आपल्याला द्यावा, अशी मागणी न्यायालयापुढे केली. यावेळी मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी या शेळ्यामेंढ्यांचा ताबा या एनजीओकडे दिला.
या सर्व कालावधीत शेळ्यांचा मृत्यू होत असल्याचे समोर आले. दरम्यान यानंतर पुन्हा एकदा शेळ्या-मेंढ्यांच्या ताब्यासाठी सत्र न्यायालयापुढे अपील दाखल करण्यात आले होते. दरम्यान आता एनजीओ शेळ्या-मेंढ्यांच्या ताब्यासाठी उच्च न्यायालयात गेले आहे. आतापर्यंत सुमारे १ हजार ८०० शेळ्या-मेंढ्याचा मृत्यू झाला आहे. आजारपणामुळे हा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे. उर्वरित शेळ्या मेंढ्या अहमदनगर येथे ठेवण्यात आल्या आहेत. आतापर्यंत सुमारे अशा प्रकारे मृत्यू ओढवल्यामुळे १ कोटीहून अधिक रूपयांचे नुकसान झाले आहे.