मी काय रिव्हॉल्वर घेऊन नाही आलो; दानवेंच्या वक्तव्यावरून सत्ताधारी आक्रमक

मुंबई – विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे 5 दिवसांचे निलंबन कमी करत 3 दिवसांचे करण्यात आले. यानंतर आज, शुक्रवारी (5 जुलै) अंबादास दानवे यांनी सभागृहात हजेरी लावली. यावेळी त्यांनी अर्थसंकल्पावर चर्चा करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. अंबादास दानवे यांनी शालेय विद्यार्थ्यांना देण्यात येणारे कपडे दाखवले. मात्र अंबादास दानवे यांच्या या कृतीवर मंत्री शंभूराज देसाई आणि आमदार प्रवीण दरेकर यांनी आक्षेप घेत तालिका अध्यक्षांकडे यासंदर्भात विचारणा केली. यावेळी अंबादास म्हणाले की, गणवेश ही वस्तू आहे, मी काय रिव्हॉल्वर घेऊन नाही आलो. दानवेंच्या या वक्तव्यानंतर सभागृहात काही काळ सत्ताधारी आणि विरोधकांकडून गोंधळ घालण्याचा प्रयत्न झाला.
“एक राज्य एक गणवेश” ही सरकारची योजना कशी फोल ठरले, हे दाखवण्यासाठी अंबादास दानवे यांनी प्रत्यक्ष गणवेशाचे कापड सभागृहात दाखवले. त्यांच्या या कृतीवर मंत्री शंभूराज देसाई यांनी आक्षेप घेत तालिका अध्यक्षांना विचारणा केली की, अंबादास दानवे यांनी कपडे सभागृहात दाखवण्याची परवानगी घेतली होती का? कुठलीही वस्तू बाहेरून सभागृहात आणून त्याचं प्रदर्शन करायला सभापतीची परवानगी लागते. तुम्ही (विलास पोतनीस) याठिकाणी बसण्यापूर्वी उपसभापती नीलम गोऱ्हे बसल्या होत्या. त्यामुळे तुम्ही त्यांना खुलासा करावा की, अंबादास दानवे यांनी कपडे सभागृहात दाखवायची परवानगी घेतली आहे. पण जर त्यांनी परवानगी घेतली नसेल तर त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली.
शंभूराज देसाई यांच्या मागणीनंतर तालिका अध्यक्ष विलास पोतनीस यांनी तपासून सांगतो असे म्हटले. पण सत्ताधारी आणि विरोधकांनी सभागृहात गोंधळ घालण्यास सुरूवात केली. अंबादास म्हणाले की, गणवेश ही वस्तू आहे, मी काय रिव्हॉल्वर घेऊन नाही आलो. दानवेंच्या या वक्तव्यानंतर सत्ताधारी आणखीनच आक्रमक झाले. याचवेळी उपसभापती नीलम गोऱ्हे सभागृहात आल्या. त्यांनी अंबादास दानवे आणि शंभूराज देसाई यांची बाजू ऐकून घेतली. यानंतर प्रवीण दरेकर हे बोलायला उभे राहिले.