मनोरंजन

अक्षय कुमारला तिसऱ्यांदा कोरोनाची लागण

मुंबई – बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारला तिसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. अक्षय कुमार गेल्या दोन दिवसांपासून तो ‘सरफिरा’ या आगामी हिंदी चित्रपटच्या प्रमोशनमध्ये व्यग्र होता. प्रमोशन दरम्यानच त्याला कोरोनाची लागण झाली. तब्येत ठीक नसल्यामुळे त्याने कोरोनाची चाचणी केली. त्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे अक्षयने स्वत:ला क्वारंटाईन करून घेतले आहे. तो सध्या डॉक्टरांनी सांगितलेल्या सर्व सूचनांचे पालन करत आहे.

कोरोनाची लागण झाल्याने अक्षय उद्योजक मुकेश अंबानी यांचे चिरंजीव अनंत अंबानी यांच्या लग्नाला उपस्थित राहू शकणार नाही. सध्या अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाची धामधूम सुरू आहे. मुकेश अंबानींच्या लाडक्या लेकाच्या लग्नाला देश विदेशातील अनेक नामांकित व्यक्तींनी हजेरी लावली आहे. शाहरुख खान, सलमान खानपासून ते युकेचे माजी पंतप्रधान बोरीस जॉनसन, सॅमसंगचे सीईओ व इतर अनेक पाहुणे लग्नासाठी मुंबईत दाखल झाले आहेत.

बॉलीवूडचा खिलाडी कुमार म्हणजेच अक्षय कुमार या सोहळ्याला हजर राहिला नसल्याने त्याच्या गैरहजेरीबद्दल विविध अंदाज लावले जात होते. स्वत: नवरा मुलगा म्हणजेच अनंत अंबानीने अक्षय कुमारला घरी जाऊन या लग्नसोहळ्याचे आमंत्रण दिले होते. असे असताना तो गैरहजर का? असा अनेकांना प्रश्न पडला होता.  अक्षय कुमारच्या गैरहजेरीचे कारण समोर आले आहे.अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाबद्दल बोलायचे झाल्यास गेल्या काही दिवसांपासून विधींना सुरुवात झाली आहे. हळदीच्या वेळी राधिकाने खऱ्या फुलांचा घातलेला ड्रेस लक्षवेधी होता. याबरोबरच, या संपूर्ण सोहळ्याला जगाच्या कानाकोपऱ्यातून पाहुण्यांनी हजेरी लावली आहे.

दरम्यान, अक्षय कुमारचा ‘सरफिरा’ हा चित्रपट आज प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. डेक्कन एअरलाइन्स ज्या व्यक्तीने उभी केली, त्याच्या आयुष्यावर हा चित्रपट आहे. तमिळ भाषेत प्रदर्शित झालेला ‘सोरारई पोटरु’ या बायोपिकचा हा रिमेक आहे. या चित्रपटात त्याच्याबरोबर बॉलीवूड अभिनेत्री राधिका मदान ही प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन सुधा कोंगारा यांनी केले आहे.

चित्रपटाच्या शूटिंगच्या सुरुवातीच्या काळात आम्हाला एकमेकांची कामाची पद्धत समजून घेण्यात वेळ गेला, असे अक्षय आणि सुधा यांनी मुलाखतीदरम्यान कबूल केले होते. गेल्या काही दिवसांपासून अक्षय या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र होता, यादरम्यानच तो आजारी पडला आहे. आता हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काय कमाल दाखवणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!