मुंबई महानगर पालिका बारखास्तीमुळे लोक नियुक्त प्रतिनिधी नसल्यामुळे महापालिका प्रशासन ढिम्म!
आमदार सुनिल प्रभु यांनी केली कुरार मधील मुख्य रस्त्यांची पाहणी

मुंबई – दिंडोशी विधानसभा क्षेत्रातील पश्चिम द्रुतगती महामार्ग ते आप्पापाडा येथील रस्त्याच्या दुरुस्तीची कामे सुरु आहेत त्याच प्रमाणे काही ठिकाणी रस्त्यालगत असलेल्या पर्जन्य जलवाहिन्यांची कामे देखील सुरु आहेत तर मलनिस्सारण वाहिन्या नव्याने टाकण्याची कामे देखील सुरु आहेत या सर्व परिस्थितीमुळे तसेच कमी कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे रस्त्यांवर खड्डे पडून रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे परिणामी वाहतूक कोंडी होऊन नागरीकांना त्रास सहन करावा लागतोच तर पादचाऱ्यांना देखील खड्यांमधून मार्ग काढत प्रवास करावा लागतो. परंतू या सर्व समस्यांबाबत महापालिका प्रशासन ढम्म आहे.
आज सोमवार दि.२९ जुलै, २०२४ रोजी दिंडोशी विधानसभा क्षेत्रातील पश्चिम द्रुतगती महामार्ग भूयारी मार्ग ते आप्पापाडा येथील रस्त्यांची पाहणी आमदार सुनिल प्रभु यांनी महापालिका अधिकारी, महाविकास आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसमावेत केली.
रस्त्यांवर जे खड्डे आहेत ते बुजवावेत, जे पेव्हर ब्लॉक आहेत ते काढून पुन्हा लावून रस्ता वाहतूक योग्य करावा, रस्त्यावर पडलेले कचऱ्याचे ढीग घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत तात्काळ उचालावेत, नव्याने बांधलेल्या भुयारी मार्गाखालील अवैध पार्किंग तात्काळ उचलून भुयारी मार्ग वाहतूक योग्य करावा अश्या अनेक सूचना यावेळी आमदार सुनील प्रभु यांनी दिल्या.
त्यांच बरोबर अप्पा पाडा, तानाजी नगर, क्रांती नगर , पठाणवाडी रस्ता पिंपरीपाड्या पर्यंतच्या रस्त्याची पाहणी देखील येणाऱ्या दोन तीन दिवसात महविकास आघाडीचे कार्यकर्ते आणि महापालिका अधिकारी व वन विभागा मार्फत करण्यात येणार आहे.
मुंबई महानगर पालिकेत नगरसेवक नसल्याने प्रशासनावर स्थानिक लोक प्रतिनिधींचा अंकुश नाही आणि यामुळेच रस्त्यांवरील खड्डे, कचरा, पर्जन्य जल वाहिन्या साफ नसणे या सारख्या अनेक समस्या सामान्य मुंबईकरांना भेडसावत आहेत. प्रशासक नेमल्यामुळे महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांचा, काम न केल्यास शिक्षा होईल हा लोक प्रतिनिधींचा धाक नाहीसा झाला आहे. आणि यामुळेच महापालिका अधिकारी दिरंगाई करीत आहेत. याचा त्रास सामान्य नागरिक भोगत आहेत. याला सर्वस्वी जबाबदार प्रशासक आणि राज्य शासन आहेत असे सुनिल प्रभु म्हणाले.
यावेळी दाखविलेले खड्डे, असमतल पेव्हर ब्लॉक, मास्टिकने करावयचे रस्ते तात्काळ दुरुस्त केले नाही तर वरिष्ठ पातळीवर तक्रार करून अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल अथवा महाविकास आघाडी मोठे जन आंदोलन करेल याला जबाबदार पालिका प्रशासनाचे प्रशासक आणि त्यांच्यावर अंकुश असलेले राज्य सरकार असेल अशा तीव्र शब्दात आमदार सुनिल प्रभु यांनी जनतेच्या मनातील संताप व्यक्त केला.
यावेळी महापलिका अधिकाऱ्यांसमवेत महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी आणि कुरार गावातील स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.