कोंकण

वांद्रे बोरिवली मार्गे मडगाव विशेष रेल्वेगाडी सुरू

मर्यादीत थांब्यामुळे कोकण रेल्वे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी

रत्नागिरी – कोकण रेल्वे मार्गावर नव्याने सुरू होत असलेल्या वांद्रे ते मडगाव आणि परत या नव्या गाडीचा प्रारंभ आज दुपारी झाला. ही गाडी येत्या ३ सप्टेंबरपासून आठवड्यातून दोन वेळा नियमितपणे धावणार आहे. आज दुपारी बोरिवली रेल्वे स्थानकात शुभारंभ सोहळा पार पडला. केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल, मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशीष शेलार यांच्यासह बोरिवली, दहिसर, मागठाणे येथील स्थानिक आमदारांच्या उपस्थितीत वांद्रे ते मडगाव दरम्यान धावणाऱ्या गाडीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले होते. त्यांनी या गाडीला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर शुभारंभाची 09167 क्रमांकाची गाडी मडगावच्या दिशेने रवाना झाली. ती गाडी आज, गुरुवारी रात्री साडेनऊ वाजता रत्नागिरीत येणार असून कणकवलीत मध्यरात्री १२ वाजता, सिंधुदुर्गला मध्यरात्रीनंतर १२ वाजून २० मिनिटांनी, सावंतवाडीला मध्यरात्रीनंतर १ वाजता पोहोचेल. ही गाडी उद्या, शुक्रवारी पहाटे ४ वाजता मडगावला पोहोचणार आहे.

या मार्गावरील नियमित गाडी ३ सप्टेंबरपासून सुरू होईल. वांद्रे मडगाव 10115 क्रमांकाची ही गाडी दर बुधवार आणि शुक्रवारी सकाळी ६ वाजून ५० मिनिटांनी वांद्रे येथून सुटेल. या गाडीचे महत्त्वाचे थांबे आणि वेळ अशी – बोरिवली ७.२३, वसई ८.०५, भिवंडी ८.५०, पनवेल ९.५५, रोहा ११.१५, वीर दुपारी १२.००, चिपळूण दुपारी १.२५, रत्नागिरी ३.३५, कणकवली सायंकाळी ६.००, सिंधुदुर्ग ६.२०, सावंतवाडी ७.००, मडगाव रात्री १० वाजता.

परतीच्या प्रवासात 10116 क्रमांकाची मडगाव वांद्रे गाडी दर मंगळवार आणि शुक्रवारी सकाली ७ वाजून ४० मिनिटांनी सुटेले. या गाडीचे महत्त्वाचे थांबे आणि वेळ अशी – सावंतवाडी सकाळी ९.००, सिंधुदुर्ग ९.३६, कणकवली ९.५०, रत्नागिरी दुपारी १.३०, चिपळूण ३.२०, वीर सायंकाळी ५.३०, रोहा ६.४५, पनवेल रात्री ८.१०, भिवंडी ९.०५, वसई १०.०५, बोरिवरी १०.४३, वांद्रे रात्री ११.४० वाजता. गाडीला १५ डबे असतील. त्यांचा तपशील असा २ टायर एसी – १, ३ टायर एसी – २, ३ टायर इकॉनॉमी १, स्लीपर ६, सर्वसाधारण ३, जनरेटर कार १, एसएलआर १. कोकणवासीयांच्या मागणीनुसार ही गाडी जाहीर झाली तरी गाडीला अपेक्षेप्रमाणे थांबे न मिळाल्याने नवी गाडी मिळाल्याच्या आनंदापेक्षा गाडीला देण्यात आलेल्या अपुऱ्या थांब्यांवरून रेल्वेवर प्रचंड टीका होत आहे. ही तुतारी एक्स्प्रेसच्या थांब्याप्रमाणे थांबवून जलद गाडी म्हणून चालवावी, अशी प्रवाशांची मागणी आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!