शैक्षणिक संस्थांनी मुलींसाठी सुरक्षित वातावरण निर्माण केले पाहिजे – राष्ट्रपती

पुणे – सर्व शैक्षणिक संस्थांनी मुलींसाठी सुरक्षित वातावरण निर्माण केले पाहिजे. कारण त्या आपल्या देशाच्या विकासाचा अविभाज्य भाग आहेत, असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज केले. सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या एकविसाव्या दीक्षांत समारंभात त्या बोलत होत्या. विद्यार्थ्यांनी वंचित वर्गाला उपयोगी पडतील आणि शाश्वततेला बळ देतील अशा संगणक प्रणाली आणि आरोग्य प्रणाली तयार कराव्यात, असे आवाहन त्यांनी केलं.
मूल्याधारित शिक्षण देणं आणि विद्यार्थ्यांना समाजाची संस्कृती आणि गरजा समजून देणं हे शैक्षणिक संस्थांचं ध्येय असलं पाहिजे, असं त्या म्हणाल्या. स्टार्टअप इंडिया, स्किल इंडिया, डिजिटल इंडिया अशा अभियानांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मदत मिळेल, असा विश्वास राष्ट्रपतींनी व्यक्त केला.
महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी चांगलं नेतृत्व असल्याशिवाय समाजातून गरिबी हटवणं शक्य नाही असं मत व्यक्त केलं. कुलपती शां. ब. मुजुमदार यांनी राष्ट्रपतींच्या अदम्य भावनेबद्दल आणि करिअरबद्दल कौतुक केलं राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील या प्रसंगी उपस्थित होते.