कोंकण

कोकणच्या प्रादेशिक विकासासाठी राज्यपालांना साकडे

रत्नागिरी – कोकणच्या विशेषतः रत्नागिरीच्या प्रादेशिक विकासासाठी राज्यपाल सी. पी राधाकृष्णन यांची सदिच्छा भेट घेतल्याची केल्याची माहिती माजी आमदार बाळ माने यांनी दिली. माने यांनी माजी आमदार राजन तेली, सौ. माधवी माने, मिहिर माने, विराज माने यांच्यासमवेत राज्यपाल राधाकृष्णन् यांची मुंबईतील राजभवनात भेट घेतली. सी. पी राधाकृष्णन यांनी ३१ जुलै २०२४ रोजी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून शपथ घेतली. चार दशकांहून अधिक राजकीय, प्रशासकीय अनुभव त्यांच्याकडे आहे. याच अनुषंगाने कोकण विकासाबाबत त्यांच्याशी चर्चा करण्यात आल्याचे माने म्हणाले. कोकणातील आंबा, काजू बागायतदारांच्या समस्या मांडल्या. मच्छीमारांसाठी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये जागतिक पातळीवरचे बंदर उभे राहावे. तसेच कोकण रेल्वेचे दुपदरीकरण, चिपळूण-कराड रेल्वेमार्ग, वैभववाडी-कोल्हापूर मार्ग आणि जयगड-डिंगणी मालवाहतूक रेल्वे होण्याकरिता राज्यपालांसोबत सकारात्मक चर्चा झाल्याचे श्री. माने यांनी सांगितले. ते म्हणाले, कोकणात प्रादेशिक विकासाचा असमतोल, प्रलंबित विकास प्रकल्पांविषयी चर्चा केली. राज्य आणि केंद्र सरकार, केंद्रीय गृह मंत्रालय आणि प्रधानमंत्री कार्यालयाकडे राज्यपाल पाठपुरावा करू शकतील. तशी विनंती राज्यपालांना केली.

माने म्हणाले की, रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा, काजू शेतकरी अडचणीत आहेत. बॅंकांची थकित कर्जे आहेत. त्यांना नव्याने कर्ज मिळत नाही. त्यांचे कर्ज माफ व्हावे आणि सवलतीच्या दरात व सीबिल स्कोअर न पाहता विशेष बाब म्हणून आंबा, काजू बागायतदारांना उभे राहण्यासाठी प्रयत्न करावा. हवामानातील बदलामुळे आंबा, काजू पिकाचे रक्षण होत नाही. त्याकरिता फवारणीसाठी महागडी औषधे घ्यावी लागत आहेत. त्यामुळे पर्यायी औषधांचे संशोधन व्हावे, ही औषधे कमी किमतीत मिळावीत, यासाठी आयसीआर यांना राज्यपालांनी सांगावे, अशी विनंती केली आहे. काजूला हमीभाव मिळावा. तसेच आंबा उत्पादक शेतकऱ्याला वाहतूक व पॅकेजिंगसाठी सब्सिडी द्यावी. प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेतील काही तांत्रिक त्रुटी दूर झाल्या पाहिजेत. मच्छीमारांना रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात जागतिक दर्जाचे बंदर हवे आहे. त्याचबरोबर मत्स्य प्रक्रिया उद्योगांना प्राधान्याने निर्यातीसाठी अधिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, अशी मागणी केल्याचे बाळ माने यांनी नमूद केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!