दिंडोशी येथील म्हाडा वसाहतीत फिरणाऱ्या बिबट्यां बाबत आमदार सुनील प्रभुंचे वनमंत्र्याना साकडे

मुंबई : दिंडोशी- गोरेगाव पूर्व येथील न्यू म्हाडा वसाहतीत गेल्या काही दिवसांपासून रात्री मुक्त पणे फिरणाऱ्या बिबट्यां वर प्रतिबंधित उपाय करणे बाबत आमदार सुनील प्रभू यांनी वनमंत्र्याना निवेदन दिले आहे.
गोरगाव पूर्व न्यू म्हाडा वसाहत, दिंडोशी येथील माँ साहेब मीनाताई ठाकरे क्रीडांगण, जवळ असलेल्या नागरी वस्तीत गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा सततच्या हालचाली नागरिकांच्या निदर्शनास दिसून येत आहेत.आजूबाजूला असलेल्या सोसाट्यांमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये बिबट्याचा वावर कैद झालेला आहे. स्थानिक नागरिकांमध्ये या मुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, सार्वजनिक सुरक्षेचा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे.
या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षाचे आमदार सुनील प्रभू यांनी राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे तातडीने कारवाईची करण्याची मागणी केली आहे. या नागरी परिसरात वाढलेल्या बिबट्याचा वावर नियंत्रित करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याची विनंती त्यांनी वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
पत्रामध्ये प्रभू यांनी सुचवलेल्या उपाययोजना पुढीलप्रमाणे आहेत:
१. बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी अतिरिक्त ट्रॅप कॅमेरे बसविणे.
२. पिंजरे लावून बिबट्याला जेरबंद करणे.
३. परिसरात गस्त वाढवणे, आणि स्थानिक नागरिकांना मार्गदर्शन व जनजागृती करणे.
वनविभागाने या मागणीकडे तातडीने लक्ष देऊन योग्य ती कार्यवाही करावी, जेणेकरून नागरिकांच्या मनामधील भीती कमी होऊन बिबट्याच्या वावरास प्रतिबंध करता येईल, असे प्रभू यांनी स्पष्ट केले आहे.