महाराष्ट्र

अतिवृष्टीग्रस्त भामरागडात हेलिकॉप्टरने पोहोचविले रक्त

‘खाकी’ वर्दीने दाखविलेल्या माणुसकीची सध्या सर्वत्र चर्चा

गडचिरोली – तीन दिवसांपासून अतिदुर्गम, नक्षलप्रभावित व आदिवासीबहुल भामरागडचा जोरदार पावसामुळे संपर्क तुटलेला आहे. ८ सप्टेंबरला पुरातून वाट काढत एका महिलेची वैद्यकीय अधिकार्‍यांनी प्रसुती केली होती. मात्र, या मातेला रक्ताची गरज भासली. पुरामुळे सगळ्या वाटा अडलेल्या होत्या. अशा परिस्थितीत ११ सप्टेंबरला पावसाने विश्रांती घेतल्यानंतर सकाळी हेलिकॉप्टरने रक्ताची पिशवी पोहोचवण्यात आली. पूरसंकटात आरोग्य विभागाची तत्परता व ‘खाकी’ वर्दीने दाखविलेल्या माणुसकीची सध्या सर्वत्र चर्चा आहे. मंतोशी गजेंद्र चौधरी (२४,रा.आरेवाडा ता. भामरागड) असे महिलेचे नाव आहे. ८ सप्टेंबर रोजी तिला प्रसववेदना जाणवू लागल्या. मात्र, याचवेळी अतिवृष्टीमुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. भामरागडचा संपर्क तुटला होता. मात्र, आरोग्य यंत्रणेने तत्परता दाखवत पुरातून वाट काढत तिला दवाखान्यात आणले. राज्य आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या जवानांनी यासाठी डॉक्टरांची मदत केली. दरम्यान, ९ रोजी मंतोशीची सुरक्षित प्रसूती झाली.

दरम्यान, मंतोशीचा B-ve हा रक्तगट आहे. या रक्ताची एक पिशवी तिला चढवण्यात आली होती. मात्र, तिच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी आणखी एका रक्त पिशवीची गरज होती. पुराने रक्ताची पिशवी भामरागड ग्रामीण रुग्णालयात पोहोचविणे कठीण झाले होते. एकीकडे पूर व दुसरीकडे खराब हवामान यामुळे हेलिकॉप्टरने रक्तपिशवी पोहाेचविण्यास अडचण येत होती. अखेर ११ रोजी आकाश निरभ्र होताच गडचिरोलीतून एक पिशवी रक्त घेऊन आरोग्य कर्मचारी भामरागडला रवाना झाले. यासाठी पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी जिल्हा पोलीस दलाचे हेलिकॉप्टर विनाविलंब उपलब्ध करुन दिले. सध्या माता व बाळाची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!