राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ; गेल्या २४ तासात ४६७२३ नवे रूग्ण

मुंबई- गेल्या चार दिवसांपासून कोरोना रूग्णसंख्येत दिलासादायक चित्र दिसल्यानंतर आज कोरोना रूग्णसंख्येत मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या २४ तासात राज्यात कोरोनाचे ४६७२३ नवे रुग्ण आढळले आहेत.तर आज दिवसभरात एकूण ३२ जणांचा मृत्यू झाला आहे.
राज्यात गेल्या २४ तासात २८०४१ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. राज्यात मंगळवारी ३४,४२४ रुग्णांची नोंद करण्यात आली होती. त्या तुलनेत आज जवळपास १२ हजार अधिक रुग्णांची भर पडल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे राज्याच्या चिंतेत भर पडली आहे.
राज्यात आज ८६ ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झालेली आहे. आतापर्यंत १३६७ ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात झाली आहे. त्यापैकी ७३४ रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहेत.
मुंबईतील कोरोना परिस्थिती-
मुंबईत गेल्या २४ तासांत १६ हजार ४२० नवे कोरोनाबाधित सापडले असून ७ जणांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारच्या तुलनेत जवळपास ५ हजार अधिक कोरोनाबाधित आढळले आहेत.
मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, मुंबईत मंगळवारी १४ हजार ६४९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे मुंबईचा रिकव्हरी रेट ८७ टक्क्यांवर कायम राहिला असून मागील २४ तासांत सात जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.