ज्येष्ठ नागरिकांच्या संदर्भातीलकायदेविषयक तरतुदींवर मुंबई मराठी पत्रकार संघात उद्या दि.१५ फेब्रुवारी रोजी कार्यशाळेचे आयोजन

मुंबई, शनिवार :- ज्येष्ठ नागरिकांच्या संदर्भातील कायदेविषयक तरतुदी, त्यांच्या समस्या आणि त्यावरील उपाय याबाबत कायदेविषयक कार्यशाळा मुंबई मराठी पत्रकार संघात मंगळवार, दि. १५ फेब्रुवारी २०२२ रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत आयोजित करण्यात आली आहे.
मुंबई नगर दिवाणी न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश व मुंबई जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्ष श्रीमती उर्मिला जोशी-फाळके या कार्यशाळेचे उद्घाटन करणार असून याप्रसंगी सन्माननीय अतिथी म्हणून प्राधिकरणाचे सदस्य सचिव श्री. हितेंद्र वाणी व मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री. नरेंद्र वि. वाबळे हे उपस्थित राहणार आहेत.
प्रसिद्ध विधी तज्ज्ञ डॉ. निलेश पावसकर, हेल्प एज इंडियाचे महाराष्ट्र आणि गोवा प्रमुख श्री. प्रकाश बोरगावकर आणि मुंबईच्या माजी महापौर अॅड. निर्मला सामंत-प्रभावळकर याप्रसंगी तज्ज्ञ वक्ते म्हणून बोलणार आहेत.
केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सोशल डिफेन्स (एनआयएसडी), रिजनल रिसोर्स अॅण्ड ट्रेनिंग सेंटर (आरआरटीसी), मुंबई मराठी पत्रकार संघ, स्वयंम फाऊंडेशन आणि सेंटर फॉर द स्टडी ऑफ सोशल चेंज (सीएसएससी) यांच्या संयुक्त विद्यमाने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.
सदर कार्यक्रम मुंबई मराठी पत्रकार संघाच्या युट्यूब चॅनेलवर व फेसबुक पेजवर लाईव्ह दाखविण्यात येणार असून ज्येष्ठ नागरिकांच्या कायदेविषयक समस्यांवर व त्यावरील उपायांवर या कार्यक्रमात उपयुक्त प्रकाशझोत पडेल, अशी अपेक्षा आहे.