महाराष्ट्रमुंबई

भाजपा आ. प्रवीण दरेकर यांच्याकडून हक्कभंग दाखल ;सूर्यकांत मोरेंवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी

मुंबई – विधानपरिषदेचे सदस्य, सभापती आणि राज्याचे सर्वोच्च मानले जाणारे विधानसभा सभागृह याबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्या सूर्यकांत मोरे यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भाजपा गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी विशेषाधिकार भंगाच्या सूचनेच्या माध्यमातून आज विधानपरिषदेत केली. अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड येथे नगरपरिषद निवडणुक प्रचार सभेत सूर्यकांत मोरे या राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या नेत्याने विधानपरिषदेचे सदस्य, सभापती आणि राज्याचे सर्वोच्च मानले जाणारे विधानसभा सभागृह याबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केली होती.

विशेषाधिकार भंगाची सूचना मांडताना दरेकर म्हणाले कि, २३ नोव्हेंबर २०२५ ला जामखेड येथे नगरपरिषद निवडणुकीवेळी शरद पवार गटाचे सूर्यकांत हंसराव मोरे यांनी सभागृहाच्या सभापतींबाबत आक्षेपार्ह विधान केले. सभागृहाच्या विशेषाधिकाराचा भंग केला. मोरे यांनी निवडणुकीच्या प्रचारात बोलताना “तांबड्या रंगाच्या बिल्ल्याला कुणी विचारत नाही व हिरव्या रंगाच्या बिल्ल्याला मंत्रालयात सचिव लगेच बसा म्हणतात. सभापतींचे काम हे सभागृहातील मतमोजणी करण्याएवढेच आहे. पंचायत समितीच्या सभापतीला जे अधिकार आहेत ते अधिकार देखील विधानपरिषदेच्या सभापतींना नाही. सभापतींसमोर २८८ सदस्य बसत नाहीत. केवळ ७०-७५ सदस्य बसतात. सभापती कायदे बनवीत नाहीत. अधिवेशनाचे कामकाज वर्षभरातून केवळ तीस दिवस होत असते. विधानपरिषद सभागृहाचे कार्पेट व एकूणच सभागृहाची रचना ही लाल रंगात असून विधानसभेची हिरव्या रंगात आहे. विधानपरिषदेचा लाल रंग हा दुष्काळाचे प्रतिक आहे”, अशाप्रकारची अत्यंत आक्षेपार्ह टिप्पणी करून सभागृहाचा आणि विशेषाधिकाराचा भंग केला.

मोरे यांच्या पक्षाचे नेते शरद पवार हेही १९९३-९६ या काळात सभासद म्हणून विधानपरिषदेवर व १९९५-९६ काळात विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेता म्हणून कार्यरत होते. राज्यसभेवरही २०१४ पासून ते कार्यरत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे याही २००६-२००९ कालावधीत राज्यसभेच्या सदस्य होत्या. इतकेच नाही तर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पृथ्वीराज चव्हाण हेही विधानपरिषदेचे सदस्य आहेत व होते. राज्यसभेचे प्रतिरूप म्हणूनच राज्याच्या विधान परिषदा कार्यरत असतात. शरद पवार, सुप्रिया सुळे, शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनाही म्हाताऱ्या माणसातून निवडून गेलेला म्हणणार का ? असा प्रश्नही दरेकर यांनी यावेळी उपस्थित केला. तसेच हा सर्व प्रकार घडत असताना विधानसभेचे सदस्य रोहित पवार, अहिल्या नगर दक्षिणचे खासदार निलेश लंके, उबाठा गटाच्या सुषमा अंधारे हेही उपस्थित होते. अंधारे यांचे नेते उद्धव ठाकरे यांनाही ही विधाने लागू होतात, असे त्यांचे मत आहे का ? रोहित पवार हे तर मोरेंच्या वक्तव्याला हसून दाद देत होते.

विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या लोकप्रतिनिधींसमोर लोकशाहीचे मंदिर असणाऱ्या या राज्याच्या सर्वोच्च सभागृहाची प्रतिमा मलीन होते, त्यावर कोणताच आक्षेप घेतला गेला नाही, ही मोठी शोकांतिका आहे. मोरे यांचे वक्तव्य अमृत महोत्सवी वाटचाल पूर्ण केलेल्या भारतीय राज्य घटनेचा घोर अवमान करणारे असून त्यांना शासन झाले पाहिजे. त्यांच्या वक्तव्याची चौकशी करून फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी विशेषाधिकार भंगाची सूचना मांडताना दरेकरांनी सभागृहात केली.

दरेकर यांनी मांडलेल्या विशेषाधिकार भंगाच्या सूचनेवर सर्वपक्षीय सदस्यांनी चर्चा केली व मोरे यांच्या वक्तव्याचा निषेध केला. चर्चेच्या शेवटी सभागृहाच्या उपसभापती डॉ.निलम गोऱ्हे यांनी स्विकारली आणि पुढील चौकशीसाठी विधानपरिषद विशेषाधिकार समितीकडे पाठवली. याबरोबरच उपसभापती यांनी पोलिसांनी वेगळी चौकशी करुन संबंधिताविरुध्द फौजदारी गुन्हा दाखल करण्याचेही निर्देश पोलीस विभागाला दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!