गोरेगाव मिररमुंबई

“बैल गेला अन झोपा केला….भातखळकर यांची मुख्यमंत्री ठाकरेंवर टीका

मुंबई: अवैध बांधकामांनी सारी मुंबई गिळंकृत केल्यानंतर आता मुख्यमंत्र्यांनी त्यावर कठोर कारवाईचे दिलेले आदेश हे उशिरा सुचलेले शहाणपण आहे, अशी टीका भाजपचे मुंबई प्रभारी व आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.

मुख्यमंत्र्यांच्याच पक्षाची मुंबई महानगरपालिकेवर गेली 30 वर्ष अव्याहतपणे सत्ता असताना अनधिकृत बांधकामांवर कारवाई करा हे सांगण्याची पाळी उद्धव ठाकरेंवर येते याबद्दल ते आत्मचिंतन करणार का? अन्यथा मुख्यमंत्र्यांचे आदेश म्हणजे बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात आहे असाच त्याचा अर्थ निघेल.

अवैध बांधकामे, अवैध झोपड्या, राडारोडा टाकून बुझवलेली तिवरांची जंगले अशा प्रकारे साऱ्या मुंबईचे विद्रूपीकरण झाल्यावर आता त्यासाठी जागाच उरली नाही. मुंबईत सरकारी भूखंडांवर, डोंगरांवर, खाजण जमिनीत, पदपाथवर, जलवाहिन्यांवर अशी इंचन इंच जागा झोपडीमाफियांनी बळकावली. पाच मजली टोलेजंग झोपड्या उभारल्या. याला जबाबदार शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचं महापालिकेतील अधिकार्‍यांसोबत असलेलं साटेलोटं हेच असून वेळोवेळी शिवसेना नेतृत्वाने ह्या अवैध बांधकामाला दिलेलं संरक्षण आहे. गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीला, गरब्याला परवानगी न देता ईदच्या मिरवणुकीला परवानगी देणारे मुख्यमंत्री या अवैध बांधकाम तोडकाम करण्याची सुरुवात बांद्र्याच्या बेहरामपाड्यापासून करणार का? असा खडा सवालही आ. भातखळकर यांनी केला आहे. अवैध बांधकामाच्या विरोधातील मुख्यमंत्र्यांचे आदेश म्हणजे ही केवळ स्टंटबाजी असल्याचा टोमणाही आ. भातखळकर यांनी मारला आहे.

मुंबई महानगरपालिकेतल्या भ्रष्टाचाराची आणि अवैध बांधकामाच्या बाबतीत शिवसेना – महानगरपालिका अधिकारी यांचं असलेलं साटेलोटं याची जाहीर खुली चौकशी करण्याची आवश्यकता असून हे धाडस मुख्यमंत्री दाखवतील का ? असा प्रश्न ही आ. भातखळकर यांनी विचारला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!