खळबळजनक! ‘बुली बाई’नंतर मुस्लीम महिलांना ट्रोल करणारं ‘सुली डिल्स’ अॅप चर्चेत

नवी दिल्ली- सध्या देशात वादग्रस्त अॅपने वातावरण चांगलंच गढूळ केलं आहे. ‘बुली बाई’ अॅप प्रकरणी मुंबई पोलीसांनी मोठी कारवाई केल्यानंतर दिल्ली पोलिसांनी आता ‘सुली डिल्स’ अॅप प्रकरणातील मुख्य आरोपी आणि मास्टरमाईंड ओंकारेश्वर ठाकूरलाही अटक केली आहे. ‘सुली डिल्स’ अॅप निर्माता ओंकारेश्वर ठाकूरला न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
बुली बाई अॅप देशात चर्चेत असताना ही अटक झाली असून अनेक बड्या नेत्यांपासून ते सेलिब्रिटींनीही या अॅपवर कारवाईची मागणी सुरू केली आहे. बुली बाई प्रकरणात पोलिसांनी चार आरोपींना अटक केली मात्र सुली डील्स प्रकरणात ही पहिलीच अटक आहे.
सुली हा मुस्लिम महिलांबद्दल वापरला जाणारा अपमानास्पद शब्द आहे. ४ जुलै २०२१ रोजी ट्विटरवर सुली डील्सच्या नावाने अनेक स्क्रीनशॉट शेअर करण्यात आले. अॅपवर ‘सुली डील ऑफ द डे’ अशी टॅगलाईन वापरण्यात आली होती आणि ती मुस्लिम महिलांच्या फोटोंसोबत शेअर केली जात होती. हे फोटोही ‘गिटहब’ अॅपवर एका अज्ञात ग्रुपने तयार केले होती. या प्रकरणी तक्रारही करण्यात आली होती, मात्र अनेक महिने त्यावर कारवाई झाली नाही.
सुली डिल्स अॅपचे निर्माते सोशल मीडिया अकाउंटवरून बेकायदेशीरपणे विविध मुस्लिम महिलांची छायाचित्रे गोळा करुन त्यावर आक्षेपार्ह मजकूर लिहून त्यांची छायाचित्रे ट्रोल करायचे. यामध्ये मुस्लिम महिलांचे फोटो चुकीच्या पद्धतीने वापरले गेले. अॅपवर हे फोटो शेअर करण्यात येऊन त्यांचा लिलावही करण्यात यायचा.सध्या या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून आणखी किती अॅप बनवण्यात आले आहेत याचा तपास पोलीस करत आहेत.