पेट्रोल, डिझेलनंतर आता साबण आणि डिटर्जंट पावडरच्या किंमतीतही मोठी वाढ

मुंबई – देशात कोरोनाच्या संसर्गामुळे कंपन्या बंद पडून अनेकांच्या नोकऱ्या गेल्या.अश्यात महागाईने सर्व सामान्य नागरिकांचे कंबरडं मोडले असताना वाढत्या डिझेल-पेट्रोल दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिक हतबल झाला आहे. यातच आता जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीत सातत्याने वाढ होत असल्याने घरचं आर्थिक गणितच बिघडून गेलं आहे.
हिंदुस्थान युनिलिव्हर आणि आयटीसी कंपन्यांनी आपल्या साबण आणि डिटर्जेंट पावडरच्या दरात अवाढव्य वाढ करून गृहिणीचे बजेट बिघडवले आहे. हिंदुस्तान युनिलीवर या कंपनीने साबण आणि डिटर्जंटच्या किंमती तीन टक्क्यांपासून ते २० टक्क्यांपर्यंत वाढवल्या आहेत. हिंदूस्तान युनिलिवर लिमीटेडच्या व्हील, रिन, सर्फ एक्सल आणि लाइफबॉय या उत्पादनांच्या किंमतीत वाढ करण्यात आली आहे.
उत्पादन खर्चात वाढ झाल्यामुळे साबण आणि डिटर्जेंटच्या किंमतीत वाढ करावी लागत असल्याचे कंपन्यांनी म्हटले आहे.कच्च्या मालाच्या किंमतीत वाढ झाल्यानं कंपनीनं उत्पादनांच्या किमतीत वाढ केली आहे. इनपूट कॉस्टमधील वाढीमुळे कंपनीने गतवर्षी देखील अनेक उत्पादनांच्या किमती वाढवल्या होत्या.अश्यात आता पुन्हा एकदा वाढ केली आहे.