पहिले राज्यस्तरीय सर्वद साहित्य संमेलन पालघरला; २७ सप्टेंबर रोजी साहित्यिकांची मांदियाळी अवतरणार
मुंबई : सर्वद फाऊंडेशन आणि सोनोपंत दांडेकर महाविद्यालय, पालघर यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक २७ सप्टेंबर २०२५ रोजी राज्यस्तरीय प्रथम सर्वद साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. सोनोपंत दांडेकर महाविद्यालय, पालघर येथे होणाऱ्या या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष शिक्षणतज्ञ महादेव रानडे असून उद्घाटन सनदी अधिकारी हर्षवर्धन जाधव यांच्या हस्ते होईल. सर्वद फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सुचिता पाटील आणि विनय राऊत यांच्या नेतृत्वाखाली हे राज्यस्तरीय साहित्य संमेलन होत आहे. सुप्रसिद्ध साहित्यिक अशोक बागवे, सतिश सोळांकूरकर, अरुण म्हात्रे तसेच आमदार मनिषाताई चौधरी आणि माजी मंत्री राजेंद्र गावीत, महाविद्यालयाचे अध्यक्ष सचिन कोरे यांची यावेळी उपस्थिती असेल. संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. किरण सावे आहेत. संमेलनाचे सूत्रसंचालन सुहास राऊत हे करतील.
सकाळी ८.३० वाजता ग्रंथदिंडीने संमेलनाला सुरूवात होईल. त्यानंतर उद्घाटन सोहळा आणि मान्यवरांची भाषणे होतील. द्वितीय सत्रात कविसंमेलन होईल. त्याचे सूत्रसंचालन प्रा. विवेक कडू, रुपाली राऊत, शीतल संखे करतील. त्यानंतर डॉ. महेश अभ्यंकर, अशोक शिंदे, सुशील शेजुळे या साहित्यिकांच्या मुलाखती निमा लोखंडे आणि नेहा राऊत घेतील. त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम होतील. यात लावणी, मंगळागौर, तारपा नृत्य असेल. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने होईल, अशी माहिती सर्वद फौंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सुचिता पाटील यांनी दिली.