महाराष्ट्रमुंबई

मुंबई मराठी पत्रकार संघात वाजणार नाटकाची तिसरी घंटा..

मुंबई / रमेश औताडे : मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात आता नाटकाची तिसरी घंटा वाजणार आहे. महाराष्ट्रातील प्रायोगिक रंगभूमीला प्रोत्साहन देण्यासाठी ‘नाट्य शुक्रवार’ या अभिनव उपक्रमाची घोषणा अलीकडेच
मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे करण्यात आली.

या उपक्रमाअंतर्गत, मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात दर महिन्याच्या चौथ्या शुक्रवारी महाराष्ट्रातील दर्जेदार प्रायोगिक नाट्याचे मोफत सादरीकरण होणार आहे. नवोदित व प्रायोगिक रंगकर्मींसाठी हे व्यासपीठ खुले असणार असून, नाट्यप्रेमींना नाट्यप्रयोगांचा नि:शुल्क आनंद घेण्याची संधी यातून मिळणार आहे.

लोकमान्य सभागृहात पार पडलेल्या पत्रकार परिषदेत संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण, विश्वस्त देवदास मटाले, दिग्दर्शक आणि अभिनेते रविंद्र देवधर, पत्रकार संघाचे कार्यवाह शैलेंद्र शिर्के, उपाध्यक्ष स्वाती घोसाळकर, पत्रकार नयना रहाळकर उपस्थित होते.

येत्या २५ जुलै २०२५ रोजी सायं. ५.०० वाजता ‘नाट्य शुक्रवार’ उपक्रमाचे उद्घाटन होणार आहे. ज्येष्ठ अभिनेते अरुण नलावडे, संजय मोने, दिग्दर्शक-लेखक मिलिंद पेडणेकर आणि इंडियन ऑईलचे कॉर्पोरेट कम्युनिकेशनचे महाव्यवस्थापक डॉ. अभिषेक कुमार यांच्या उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा रंगणार आहे.

‘मराठी प्रायोगिक रंगभूमीला बळ देणं आणि नव्या प्रयोगशील नाटकांना मंच मिळवून देणं, हा ‘नाट्य शुक्रवार’ उपक्रमाचा मूळ हेतू आहे. पत्रकार संघ केवळ पत्रकारांसाठीच नव्हे तर समाजातील उपक्रमशील घटकांसाठीही एक प्रेरणास्थान असावं, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.’ या उपक्रमाला ‘इंडियन ऑईल’चे प्रायोजकत्व लाभल्याचे अध्यक्ष संदीप चव्हाण यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!