मुंबईराजकीय

सर्वसामान्यांकरीता लोकल सुरु करा किंवा पाच हजार रु प्रवास भत्ता द्या-केशव उपाध्ये

मुंबई:राज्य सरकारने मुंबई व उपनगरातील सर्वसामान्य माणसाला लोकल प्रवासाची तत्काळ परवानगी द्यावी अन्यथा सर्वसामान्य माणसाला प्रवास भत्त्यापोटी दरमहा ५ हजार रु . द्यावेत अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी आज येथे केली. 

भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत श्री. उपाध्ये बोलत होते. प्रदेश प्रवक्त्या श्वेता शालिनी व श्री. गणेश हाके यावेळी उपस्थित होते.
श्री. उपाध्ये यांनी सांगितले की, राज्य सरकारने गेली दीड वर्षे सर्वसामान्य जनतेसाठी उपनगरी रेल्वे सेवा बंद ठेवली आहे. त्यामुळे नोकरदार, तसेच रोजगारासाठी बाहेर पडाव्या लागणाऱ्या कष्टकरी जनतेची प्रचंड गैरसोय होत आहे. या वर्गाला प्रवासापोटी मोठा भुर्दंड सहन करावा लागत आहे. अन्य वाहनांनी प्रवास करण्यासाठी भरमसाठ खर्च तर होतो त्याचबरोबर वेळेचाही अपव्यय होतो. कोरोनामुळे उत्पन्न घटलेल्या वर्गाचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. मुंबईतील प्रवासी खासगी वाहतूकदारांच्या दावणीला बांधण्याचा हा डाव आहे अशी शंका सामान्य माणसाला येऊ लागली आहे.
मुंबई, ठाणे परिसरातील जनतेने आजवर शिवसेनेला भरभरून साथ दिली आहे. या सर्वसामान्य जनतेची महाआघाडी सरकारला जाणीवच नसल्याचे चित्र दिसत आहे. राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळेच उपनगरी रेल्वे प्रवास बंद असल्याने याची भरपाई राज्य सरकारनेच देण्याची गरज आहे, असेही त्यांनी नमूद केले.
लस खरेदीसाठी राज्य सरकारने सात हजार कोटी रु. राखून ठेवले असल्याचे मुख्यमंत्र्यांनीच सांगितले होते. हे सात हजार कोटी सामान्य माणसाला प्रवास भत्ता म्हणून द्यावेत व सामान्य माणसाच्या संतापाचा उद्रेक टाळावा, असेही श्री. उपाध्ये यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!